खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के भागिदारीच्या घोषणेबद्दल चिखलीकरांचा जल्लोष
चिखली (प्रतिनिधी) – गेल्या ११२ वर्षांपासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या खामगाव – जालना रेल्वेमार्गाला आज खर्याअर्थाने दिशा मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, दि. ९ मार्चरोजी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार आपली ५० टक्के भागिदारी मंजूर करत असल्याची घोषणा केली. या घोषणेचे चिखली शहरात उत्स्फूर्तपणे स्वागत झाले. रेल्वे लोकआंदोलन समिती आणि समस्त चिखलीकरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर साखर वाटून, फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के निधी मंजूर करावा, ही प्रमुख मागणी रेल्वे लोकआंदोलन समितीने अनेक वर्षांपासून लावून धरली होती. आ. श्वेताताई महाले पाटील यांना भेटून व निवेदन सादर करून समितीने आपली मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचवली. आ. श्वेताताई महाले पाटील यांनीदेखील अतिशय तत्परतेने प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या रेल्वेमार्गाचे महत्त्व पटवून दिले. आ. श्वेताताई महाले यांच्या या नियोजनबद्ध प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणून आजच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वेमार्गासाठी ५० टक्के निधी मंजूर करत असल्याची घोषणा केली.
शिंदे – फडणवीस सरकार व आ. श्वेताताई महाले यांचे मानले आभार!
आज दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी १६५ किलोमीटरच्या खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के निधी राज्य सरकार मंजूर करत असून, याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात येत असल्याची घोषणा केली आणि चिखलीत एकच जल्लोष झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. श्वेताताई महाले पाटील यांचे आभार मानत, रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांनी साखर वाटप केली आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक आणि चिंच परिसरात हा उत्स्फूर्त जल्लोष साजरा झाला. यावेळी प्रा. किशोर वळसे, रेणुकादास मुळे, अनूप महाजन, संतोष अग्रवाल, भारत दानवे, माजी नगराध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे, सुहास शेटे, ज्येष्ठ नेते अंकुशराव पाटील, डॉ. प्रतापसिंह राजपूत, हेमंत कुचेरिया, माजी नगरसेवक गोविंद देव्हडे, नामू गुरुदासानी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित, पंजाबराव धनवे, चेतन देशमुख, गजानन कुळकर्णी, भगवान निंबाळकर, मतीन मिया, गजानन भणगे, भिकु लोळगे, प्रथमेश सदावर्ते, संजय शेळके, सिध्देश्वर ठेंग, वृषभ शर्मा, अभि वीर, राजेंद्र हांडगे, अमित मालानी, विकास सोनूने, विजय अवचार, प्रवीण महाशब्दे, आयुष कोठारी, आनंद सराफ, सम्राट जोगदंडे, हरीहर सोळंके, कैलास भालेकर, गिरीश शिरभाते, हरीभाऊ परिहार, अजय राजपूत, काशिनाथ शेळके, गोलू गिनोडे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुलढाणा जिल्ह्याला भरभरून गोड दिल्याबद्दल आ. सौ. श्वेताताई महाले यांनी ना. देवेंद्र फडणवीस यांचे तोंड केले गोड!
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये बुलढाणा जिल्ह्याला भरभरून गोड बातम्या दिल्याने आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी त्यांचे विधानसभेमध्येच पेढा भरवून तोंड गोड करून आभार व्यक्त केले.
——————-