Breaking newsHead linesKhandeshKokanMaharashtraMarathwadaMetro CityMumbaiPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update

राज्याच्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा ‘जोरदार पाऊस’!

– अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर
– शेतकर्‍यांना आता एक रुपयांत पीकविमा, वार्षिक १२ हजार रुपये देणार
– सरकारी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ८ वीपर्यंत गणवेश मोफत
– केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना आता अन्नधान्याऐवजी रोख रक्कम
– शिक्षण सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांच्या मानधनात घसघशीत वाढ
– महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट
– समृद्धी महामार्गाचा सिंदखेडराजा ते शेगाव विस्तार होणार!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्याचा वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज दुपारी सादर केले. फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा जोरदार पाऊस पहायला मिळाला. केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेत आणखी सहा हजार रुपये घालून लाभार्थी शेतकर्‍यांना वार्षिक १२ हजार रुपये देणे, बुलढाणा जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्याची ५० टक्के रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करणे, बळीराजाला अवघ्या एक रुपयांत पीकविमा देणे, तसेच, सरकारी शाळांत शिकणार्‍या आठवीपर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना चांगली शिष्यवृत्ती व गणवेश मोफत देणे यासह राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षण सेवक यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याची घोषणादेखील फडणवीस यांनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे, महिलांना सरसकट एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाणार असून, बुलढाणा जिल्ह्यातून सिंदखेडराजा ते शेगाव असा समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांची कोणतीच कसर अर्थमंत्र्यांनी सोडली नाही, असे या अर्थसंकल्पावर बोलताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले, की महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणार्‍या ६ हजार रुपयांच्या मदतीत राज्य सरकारही ६ हजार रुपयांची भर घालून ही रक्कम देणार आहे. याचा फायदा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना होणार असून, यासाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प आहे. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास आदी ध्येयांवर हा अर्थसंकल्प आधारीत असेल, असे फडणवीस म्हणाले.


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा खरपूस समाचार घेतला. शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा,असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.


२०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार असून, विद्यार्थ्यांना आता चांगली शिष्यवृत्ती आणि गणवेश मोफत मिळणार आहेत. स्थानिक सरकारी शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या सर्ववर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातील. या शिवाय, अमरावती येथील मोर्शी आणि बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येतील. याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल. केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना आता अन्नधान्याच्याऐवजी रोख रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा केली जाईल. गंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील आवर्षण प्रवणक्षेत्रात पाणी मागवण्यात येईल. याबाबतच्या सर्व आवश्यक मान्यता देऊन प्रकल्पासाठी विशेष निधीची उभारणी करून लवकरात लवकर ही कामे सुरू करण्यात येतील. तापी खोर्‍यातील नैसर्गिक पातळी दिवसेंदिवस खाली चालली आहे. पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामे करण्यात येतील. १३३ गावांना कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा लाभ होणार आहे. ११ हजार ६२६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


– राज्याच्या अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी –

– रेल्वे प्रकल्प आधुनिकीकरण
– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : ४५२ कोटी रुपये
– नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या प्रकल्पांना ५० टक्के राज्य हिस्सा देणार
– ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
– महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता १२००० रुपयांचा सन्माननिधी
– प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
– प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष ६००० रुपये राज्य सरकार देणार
– केंद्राचे ६००० आणि राज्याचे ६००० असे १२,००० रुपये प्रतिवर्ष मिळणार
– १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
– ६९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
– पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी शेतक-यांचे पैसेही आता सरकार भरणार. यासाठी सरकारकडून आर्थिक तरतूद
– महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा
– आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून
– आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
– ३३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
– कल्याण- मुरबाड नव्या रेल्वे मार्गाला मान्यता
– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक २०२५पर्यंत पूर्ण होणार
– ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार
– माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
– अंगणवाडी मदतनिसांना ५ हजार ५०० रुपये मानधन
– महिलांसाठी ५० शक्तिसदन उभारणार
– महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट
– लेक लाडकी योजनेंतर्गंत मुलगी १८ वर्षांची झाल्यास ७५ हजार रुपये मिळणार
– आशा सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ
– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण राबवणार
– जलयुक्त शिवार -२ योजना पुन्हा राबवणार
– मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी; ५० कोटींचा मत्स्यविकास कोष
– धनगर समाजाला १००० कोटी रुपये, महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात; प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी १८०० रुपये देणार
– विदर्भ, मराठवाड्यातील १४ आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
– अपघातग्रस्त शेतकर्‍यांना २ लाख रुपये मिळणार
– धान उत्पादकांना हेक्टरी १५ हजारांची मदत जाहीर
– गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटींची तरतूद
– मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन योजना
– शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी १० हजार रुपयांची वाढ
– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : ६ हजारवरुन १६ हजार रुपये
– माध्यमिक शिक्षण सेवक : ८ हजारवरुन १८ हजार रुपये
– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : ९ हजारवरुन २० हजार रुपये


समृद्धी महामार्गाचा सिंदखेडराजा ते शेगाव विस्तार होणार!

राज्यातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार आहे. सिंदखेडराजा ते शेगाव विस्तार करण्यात येणार आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अहवाल तयार होत आहे. यामुळे शक्तीपीठ जोडली जाणार आहे. दोन ज्योतिर्लिंग इतर तीर्थक्षेत्र जोडली जाणार असून हा रस्ता सहा जिल्ह्यातून जाणार आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!