सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शहरातील दूषित पाणी बंद करा, या पाण्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. या दूषित पाण्याबाबत अनेक वेळा तक्रार देऊनदेखील अद्याप बंद करण्यात आले नाही. तरी हे पाणी त्वरित बंद करावे, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अण्णाराव बाराचारे यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. परंतु नुकतेच जिल्हा नियोजन समितीवर निवडून गेलेले बाराचारे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दूषित पाण्याचा प्रश्न मांडला. याबाबत पालकमंत्री विखे पाटील यांनी तो प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देखील दिले. शहरातील एमआयडीसी येथील जे दूषित पाणी आहे, ते होटगी तलाव मध्ये जाते. यामुळे शेतकर्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. दूषित पाणी मध्ये अनेक प्रकार असतात. हे पाणी रंगाचे आहे त्यामुळे याचा परिणाम पिकावर होत आहे.
याबरोबरच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाराचारे यांनी जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषदेच्या जागा महामार्ग मध्ये गेले आहेत. त्याचे त्वरित भरपाई करून देण्याची मागणी केली. जिल्ह्यातून अनेक महामार्ग गेले आहे. हे महामार्गाचे काम करीत असताना शाळा, दवाखाने आदी जिल्हा परिषदेचे सार्वजनिक जागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानी पोटी महामार्गाने जिल्हा परिषदेकडे पैसे दिले आहे. परंतु हे पैसे अद्याप नुकसान झालेल्या शाळेला व दवाखान्याला देण्यात आले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तरी ज्या शाळा, दवाखाने याचे नुकसान झाले आहे त्यांना त्वरित जिल्हा परिषदेने निधी देण्याची मागणी याप्रसंगी बाराचारे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
नियोजन समितीच्या सदस्यांना बोलताच आले नाही!
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रश्न उपस्थित करीत अधिकार्यांना धारेवर धरले. या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आमदार विधिमंडळात जर बोलत असतील तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी मध्ये सदस्यांना बोलण्याची संधी कधी मिळणार, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता.
—————–