– आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यावतीने २१ जानेवारीला स्पर्धांचे आयोजन
चिखली (तालुका प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षेच्या तणावापासून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक शाळांमध्ये ‘एक्झाम वॉरियर’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रकला स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींमधून शाळानिहाय तीन सर्वोत्तम चित्रांमधील पहिल्या क्रमांकासाठी ३१०० रुपये, दुसर्या क्रमांकासाठी २१०० रुपये तर तिसर्या क्रमांकासाठी ११०० रूपये तसेच स्मृतीचिन्ह बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. सोबत प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहे.
या एक्झाम वॉरियर चित्रकला इयत्ता ९ ते १२ वी विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने www.parikshapecharcha.online या लिंकवर करायची आहे. यासाठी रंग ब्रश व चित्रकलेसाठी आवश्यक ते साहित्य स्पर्धकाने घरून आणायचे आहे. आयोजकांतर्पेâ ड्रॉइंग शीट पुरवण्यात येईल. स्पर्धा सुरू होण्याअगोदर प्रत्येक विद्यालयामध्ये ड्रॉइंग शीट आयोजकातर्पेâ पोहोचवण्यात येतील. रंग कामाचे साहित्य विद्यार्थ्यांसाठी पेन्सिल कलर, क्रेऑन, ऑइल पेस्टल, वॉटर कलर, पोस्टर कलर, मिक्स मीडिया कुठल्याही प्रकारचे साहित्य आणावे लागेल. स्पर्धेसाठी खालील पाच विषय देण्यात आलेले आहेत. १) कोरोना लसीकरणमध्ये भारत नंबर एक, २) सर्जिकल स्ट्राइक, ३) जी-२० जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, ४) बेटी बचाव बेटी पढाओ, ५) आजादी का अमृत महोत्सव.
या एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेमध्ये चिखली शहरातील आदर्श विद्यालय चिखली, श्री. शिवाजी विद्यालय चिखली आदर्श कॉन्वेट, उदयनगर येथील श्री. शिवाजी विद्यालय, श्री.शहाजी विद्यालय, इसोली श्री. शिवाजी विद्यालय, एकलारा श्री. विवेकानंद विद्यालय, सा.डुकरे जि.प. शाळा,म.नवघरे जि.प. शाळा , कोलारा श्री. सिद्धेश्वर विद्यालय, किन्ही नाईक आश्रम शाळा अमडापूर अमर विद्यालय, सावरखेड बु., पि. सराई जनता विद्यालय, रायपुर श्री. शिवाजी विद्यालय जिजाऊ ज्ञानमंदिर, चांडोळ श्री. शिवाजी विद्यालय मासरूळ श्री.शिवाजी विद्यालय, डोमरूळ शरद पवार विद्यालय, धाड जिप व सहकार विद्या मंदीर म्हसला जि.प.शाळा, दुधा जिजामाता विद्यालय या शाळांचा सहभाग असणार आहे.
सदर स्पर्धा विद्यालयाने आपल्या स्तरावर आयोजित करून विजयी स्पर्धकांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन क्रमांक काढावयाचे आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रकला स्पर्धा म्हणजे तणावमुक्ती आणि बक्षिसाची संधी असल्याने जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.