– लेखी आश्वासनानंतर आले वृद्ध कलावंत पाण्यातून बाहेर!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या निर्णयानुसार, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मानधन दिले जाते. याची निवड वृद्ध कलावंत मानधन समिती आणि समाज कल्याण विभागाच्या संबंधित अधिकार्यांकडून केली जाते. मात्र, या यादीमध्ये खर्याखुर्या कलावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप वृद्ध कलावंतांनी केला आहे. ३०० कलावंतांची निवड करणे बंधनकारक असताना अधिकार्यांनी फक्त २६३ जणांचीच यादी तयार केली. तसेच खर्या कलावंतांना डावलले. त्यामुळे संतप्त झालेल्या वृद्ध कलावंतांनी पैनगंगा नदीत उतरून आंदोलन केले. समाज कल्याण विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत, लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या निमित्ताने वृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने तयार केलेल्या यादीमध्ये वृद्ध कलावंतांना समाविष्ट करून मानधन देण्यात यावे, आणि या निवड यादीमध्ये घोळ करणार्या कर्मचारी, अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पैनगंगा नदीत उतरून हे आंदोलन करण्यात आले. या ठिय्या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे नदीकिनारी दाखल झालेल्या समाज कल्याण विभागाच्या पथकाने दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत युवा स्वाभिमानी संघटनेचे नेते ईश्वरसिंह चंदेल यांनी सांगितले, की शासन निर्णयानुसार ३०० कलावंतांची निवड करणे बंधनकारक असताना अधिकार्यांनी २६३ जणांचीच यादी केली. तसेच खर्या कलावंतांना डावलले. यामुळे आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर १ फेब्रुवारीला अधिकारी, कर्मचार्यांची बुलढाणा शहरात प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी कलावंतांच्या वतीने दिला आहे.
————-