‘दलित वस्ती’चा पदभार स्वाती गायकवाड यांच्याकडे; पदभार देताच गावपातळीवरील पुढार्यांची गर्दी!
सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दलित वस्तीचा टेबल स्वाती गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. हा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे.
दलित वस्ती सुधारणा योजना हे टेबल गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय झाला आहे. कारण यापूर्वी दलित वस्तीचे टेबल स्वामी यांच्याकडे देण्यात आले होते. परंतु त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यामुळे त्यांच्यानंतर सक्षम असे कुणालाही सांभाळता आले नाही. मधल्या काळात शिवानंद मगे तसेच स्वाती गायकवाड यांनी ते कसेबसे का होईना सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु मगे यांची जिल्हा परिषदेच्या स्वीय सहाय्यक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दलित वस्तीचे टेबल कोणाला द्यायचं असा मोठा प्रश्न समाज कल्याण अधिकारी यांच्यापुढे होता. मात्र त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्वाती गायकवाड यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गायकवाड यांच्याकडे दलित वस्ती सुधारणा योजनेचे टेबल येताच त्यांच्याकडे कामाच्या मागणीसाठी गाव पातळीवरील सरपंच यांची गर्दी पाहायला मिळत आहे. या दलित वस्तीचे टेबल पाहण्यासाठी गायकवाड यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण सध्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य जरी नसले तरी त्यांना जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. यासाठी ते कशा पद्धतीने ते आव्हान स्वीकारतात याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. या योजनेला तब्बल ५० कोटीहून अधिक निधी वर्षाला येतो, त्यामुळे या टेबलला महत्व आहे. हा टेबल मिळण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असतात. हा टेबल मिळविण्यात स्वाती गायकवाड या महिला विस्तार अधिकार्याला यश आले आहे. हा टेबल द्यायचा कुणाला हा गुंता मागील अनेक दिवसांपासून होता. तो अखेर सुटला असल्याचे समजले.
—————–