LATURMarathwada

रस्ता सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे – अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे

लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – दिवसेंदिवस रस्ते अपघातांची वाढणारी संख्या ही चिंतेची बाब असून, रस्ता सुरक्षेसाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्यावतीने ११ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. लोखंडे बोलत होते. परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे यंत्र अभियानात श्री. हेडाऊ, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. कलमे, वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक आवेज काजी यांच्यासह रिक्षा-टॅक्सी संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, स्कुल बस, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे पदाधिकारी, माझं लातूर परिवार तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक व मालक, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.रस्ते अपघाताविषयी आपण रोज वाचतो, ऐकतो. हे अपघात रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. रस्ते अपघातांना कारणीभूत ठरणार्‍या गोष्टी टाळणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी वाहतूक नियम जाणून घ्यावेत, असे आवाहन श्री. लोखंडे यांनी यावेळी केले.

सद्यस्थितीत होणारे अपघात हे खुनांच्या गुन्हाच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीने जास्त आहेत. हे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. देवरे यांनी सांगितले. प्रस्ताविकामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. नेरपगार यांनी लातूर जिल्ह्यातील अपघातांची विश्लेषणात्मक माहिती दिली. तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश स्पष्ट केला. रस्ता सुरक्षा सप्ताह कालावधीत संपूर्ण जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रबोधनाबरोबरच कार्यवाही व अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. भोये यांनी दिली. तसेच यावर्षी अपघाताचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना रस्ता सुरक्षाविषयक प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. विना अपघात सेवा केलेल्या वाहन चालकांना यावेळी गौरविण्यात आले आहे. सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सविता पवार यांनी केले, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!