Head linesSOLAPUR

‘जन सुविधा योजने’ची आमदारांची यादी फायनल!

सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून घेण्यात येणार्‍या विविध विकास कामाची अंतिम यादी झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला ठरवून दिल्याप्रमाणे निधी वाटप आणि ठेकेदाराला कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. परंतु मागणी अधिक असल्याने वाढीव निधीची अपेक्षा प्रशासनाला आहे.

जिल्हा परिषदेला चालू वर्षी जनसुविधा योजनेतून २० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मागील वर्षी दायित्वाचे जवळपास नऊ कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यामुळे यंदा जन सुविधासाठी जवळपास ११ कोटी रुपये प्रत्यक्ष मिळणार आहेत. या ११ कोटीमध्येदेखील जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांना एक कोटी प्रमाणे विकास कामासाठी निधी देण्यात आले आहेत. त्यासाठी कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला आहे. मात्र अद्याप खासदार आणि पालकमंत्री यांच्या कोट्यातून देण्यात येणार्‍या कामाची यादी फायनल झालेली नाही. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी झेडपीच्या सदस्य यांच्या शिफारशीने आणि त्यांना ठरवून देण्यात येणार्‍या कोट्याप्रमाणे निधी दिला जातो. परंतु झेडपी मध्ये प्रशासक असल्याने सध्या सदस्य नसल्याने आमदार, खासदार, पालकमंत्री यांना निधी वाटपाचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच त्यांना निधीचा कोटादेखील ठरवून देण्यात आला आहे. त्यासाठी आमदारांना ८० टक्के, पालकमंत्री यांना १० टक्के खासदारांना १० टक्के असा निधी वाटपचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. यावर्षी प्रशासनाला कोणत्याही प्रकारे निधी वाटपाचा अधिकार देण्यात आला नसल्यामुळे सध्या आमदार खासदार यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्ते चकरा मारत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, पालकमंत्री व खासदार यांची यादी आज फायनल होण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. तसेच यावर्षी वाढीव निधी मिळावा याची देखील अपेक्षा प्रशासनाला आहे. परंतु आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाढीव निधीची तरतूद करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


झेडपीच्या निधीवर आमदाराची घुसखोरी

जिल्हा परिषदेमध्ये जन सुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र आराखडा या सर्व विकास कामावर झेडपी सदस्य यांचा हक्क होता. हे झेडपीचे सदस्य गटामध्ये असणार्‍या गावांना समान निधी वाटप करीत होते. परंतु प्रशासकांच्या कार्यकाळात आमदारांना निधी वाटपाचे अधिकारदिले आहे. त्यामुळे झेडपीच्या निधीवर आमदारांनी घुसखोरी केली असल्याचा सूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्याकडून निघत आहे.
————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!