सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेल्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील शिक्षक हरी गोपीनाथ काळे यांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यांच्या पत्नीला गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देय रकमा मिळाल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्नीला चक्क घरामध्येच अस्थी ठेवून जिल्हा परिषदेकडे हेलपाटे मारावे लागत आहे.
हरी काळे यांचा मृत्यू २५ मार्च २०२२ रोजी किडनी विकारामुळे झाला होता. काळे हे वाघमोडे वस्ती वाशिंबे येथे गेली १४ वर्षे पाच महिने कार्यरत होते. त्यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित देखील करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला अस्थि विसर्जनासाठी देखील पैसे नाहीत. अशी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन महिने थकीत रकमा, मेडिकल बिल, डीसीपीएस रक्कम, अनुकंपा खालील नियुक्ती करावी, चटोपाध्याय वेतनश्रेणी अशी मागणी सुप्रिया हरी काळे यांनी केली आहे. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या रकमांना मिळाल्यास जिल्हा परिषदेसमोर त्यांच्या अस्थी घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांच्या पत्नी सुप्रिया हरी काळे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जाहीर यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पतीच्या देय रकमा मिळाव्यात, यासाठी चकरा मारीत आहे. परंतु शिक्षणाधिकारी माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करत आहेत. आठवड्यातून दोनवेळा जिल्हा परिषदेकडे येण्याची वेळ येत आहे.
– सुप्रिया हरी काळे, विधवापत्नी
——————-