Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

सोलापूरकर, शेतकरी यांना हवी ‘चिमणी’, अन् विमानतळ; काढला महाविराट मोर्चा!

– कारखाना बंद पाडून शेतकर्‍यांच्या घरावर नांगर फिरवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मोर्चा – धर्मराज काडादी

सोलापूर (संदीप येरवडे) – श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याला कोणताही धक्का न लावता, होटगी रोड विमानतळावरून तूर्त विमानसेवा एका बाजूने सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता सिध्देश्वर साखर कारखान्यापासून होम मैदानापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. महामोर्चा मार्गावर जणू जनसागर उसळला होता. सिद्धेश्वर कारखाना बचावासाठी एकच निर्धार करत, हजारो शेतकर्‍यांसह नागरिकांनी एकजुटीची वज्रमूठ आवळली.

कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बचावासाठी निघालेल्या महामोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. आज सकाळी या साखर कारखान्याच्या कार्यस्थळापासून विराट महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी व सभासद हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आणि ‘सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बचाव’ यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून हा अतिविराट, विशाल महामोर्चा काढण्यात आला. सिध्देश्वर साखर कारखान्यापासून या महामोर्चाला सुरुवात झाली. पुढे हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, आसरा चौक, महावीर चौक, सात रस्ता, रंगभवन मार्गे तो होम मैदानावर पोहोचला. त्या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता. खणखणीत आणि दणदणीत अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह सर्वपक्षीय नेते व पदाधिकार्‍यांची भाषणे झाली. यावेळी सिध्देश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, शेतकरी संघटनेचे नेते अख्तरताज पाटील, शिवानंद दरेकर, अमोल हिप्परगी, बोरामणी विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष प्रा. राजू चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, सिध्देश्वर साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा माजी चेअरमन धर्मराज काडादी हे चांगलेच आक्रमक दिसून आले. ते म्हणाले, की मला आणि कारखान्याला विरोध करण्यासाठी काही मंडळींचे षडयंत्र सुरू आहे. आम्ही सर्व काम नियमानेच करत आहोत, मात्र वारंवार कोर्टात धाव घेऊन काही मंडळी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पडद्यामागे असलेल्या व्यक्तींचा खुलासा योग्यवेळी करणार आहोत. मागील अनेक वर्ष आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या सर्वांना लढा दिला. मात्र आता सभासद स्वतःहून रस्त्यावरती उतरत आहेत. आज निघणारा मोर्चा हा सर्वसामान्य सभासद शेतकर्‍यांचा आहे, याला कुठलाही राजकीय अजेंडा नाही असेही त्यांनी म्हटले. कारखाना वाचवण्यासाठी विधीमंडळातील सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी बोरामणी विमानतळ सुरू होण्यासाठी सभागृहात आवाज उठवावा, अशी मागणीदेखील कडादी यांनी केली. हा कारखाना बंद पाडून शेतकर्‍यांच्या घरांवर नांगर फिरवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तविक पाहता, सोलापूरची विमानसेवा ही बोरामणी विमानतळ विकसित करूनच झाली पाहिजे, असे २००८ व २०११ मध्ये केंद्र व राज्य सरकारच्या ‘जीआर’प्रमाणे ठरले होते. मात्र दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये सत्तापालट झाली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मंडळींनी याकडे दुर्लक्ष केले आणि केवळ कारखान्याची चिमणी आडवी येते. हा चुकीचा मेसेज दिला. त्यानंतर विमानसेवेच्या आडून साखर कारखाना व धर्मराज काडादी यांना कसे संपविता येईल, अशा पद्धतीने व्यक्तीद्वेषातून काम केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाच्या विमानसेवेला अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाने म्हणणे होते. त्यामुळे विमानतळ सुरू करण्यासाठी कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी सोलापुरात यापूर्वी आंदोलन झाले होते. या आंदोलनाला आधी उपोषण, त्यानंतर रास्ता रोको आणि आता विराट मोर्चाने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!