– रस्त्याची दयनीय अवस्था, चारचाकी वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत!
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत – करमाळा हा रस्ता गेली अनेक महीने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, खड्डे, खराब रस्ता, अनेक ठिकाणी बारीक दगड तर अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खचल्याने डांबरी रस्ता धोकादायक व जीवघेणा बनलेला आहे. या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.
कर्जत तालुक्यातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी याचबरोबर पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, या महत्वाच्या देवस्थानाला जाणार्या भाविकांसाठी असलेला अत्यंत महत्वाचा रस्ता असला तरी या रस्त्याचे दुर्दैवाचे दशावतार मात्र कधीच संपत नाहीत, याच रस्त्यावर जेजुरी नंतरचे महत्वाचे श्री खंडोबाचे स्थान शेगुड येथे आहे तर करमाळ्याची देवीही प्रसिद्ध आहे. अशा या महत्वाच्या रस्त्याकडे लक्ष देण्यास व तो कायमस्वरुपी चांगला करण्याकडे कोणीच लक्ष देत नाहीत, ही बाब आश्चर्यकारक आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, काही ठिकाणी मातीमिश्रित मुरूम व त्यातील दगड टाकून लोकांच्या त्रासात भरच पडत आहे. या छोट्या दगडावरून अनेक दुचाकी घसरून पडत आहेत तर रस्ता खराब असल्याने चार चाकी वाहनाना ही कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून केली जात आहे.
कर्जत-करमाळा राष्ट्रीयमार्ग ६७ या मार्गावरील कोरेगाव फाटा ते आंबीजळगाव शेगुड या २०३ ते २१२ किमी दरम्यान सुधारणा करण्यासाठी ४८९.८० लक्ष रुपयाची निविदा मंजूर झालेली असून, सदर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन दि. २५ फेब्रूवारी २०२२ रोजी आ. रोहित पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर आज अखेर १० महिने होऊन ही या कामाला सुरुवात झाल्याचे पहावयास मिळत नाही, त्यामुळे हे भूमिपूजन फक्त दिखाव्यापुरते होते का? तसे होत नसेल तर आ. पवार व त्याचे कार्यकर्त्यांसह असलेली नियोजन यंत्रणा या रस्त्याच्या कामाकडे का लक्ष देत नाहीत असाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जत – करमाळा या रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, त्यांना कोणतीही माहिती देता आली नाही. चौकशी करतो, माहिती घेतो अशा उत्तराने कार्यकारी अभियंता प्रशांत वाघचौरे यांनी पत्रकारांना माहिती देण्याची असमर्थता व्यक्त केली. याशिवाय, सध्या खडी मिळत नसल्याने काम सुरू नाही असे मोघम उत्तर दिले. मात्र खडीचा प्रश्न सध्या काही दिवसापासून सुरू असून, या रस्त्याचे भूमिपूजन होऊन दहा महिने झाले असताना या रस्त्याची अद्याप सुधारणा का करण्यात आली नाही, याबाबत आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांनी व त्याच्या कार्यकर्त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.