कृषी विभागात आंदोलनास सुरु होताच तालुका तक्रार निवारण समितीने घेतली बैठक!
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांपैकी एक मागणी तातडीने मान्य
चिखली (एकनाथ माळेकर) – शेतकर्यांनी अॅग्रीकल्चर इन्सुरन्स (एआयसी) विमा कंपनीच्या माध्यमातून शेतीपिकाचा विमा काढला आहे. विमा मंजूर झाला. परंतु अनेकांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा झाली असल्याने विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात व शेतकरीहिताच्या विविध मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्यासह शेतकर्यांनी आक्रमक पावित्रा घेत, कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. दरम्यान, आंदोलनास सुरुवात होताच शासन नियुक्त तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असलेले तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांनी तातडीने बैठक बोलावली व तक्रारींचा आढावा घेतला. या बैठकीचा अहवाल जिल्हा समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. येळे यांनी सांगितल्याने, आंदोलकांची एक मागणी आज पूर्ण झाली आहे.
शेतकर्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या उभ्या पिकाला कोंब फुटले तर नदीकाठच्या शेतीपिकाचेसुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असतांना रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने बैठक बोलावत, राज्यासाठी पीकविमा मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे पहिल्या टप्यात अतिवृष्टीची नुकसान भरपाई रक्कमदेखील मंजूर केली आहे. परंतु अॅग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनीकडून (एआयसी) पीकविमा रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली. परंतु ती प्राप्त रक्कम विमा कंपनीने मनमानी पध्दतीने जमा केली होती व नियमानुसार टाकली नाही. तर काहिंना ब-यापैकी तर अनेकांच्या खात्यावर तुटपुंजीच म्हणजे प्रिमीयम पेक्षा सुद्धा कमी रक्कम मिळाली आहे. त्याचप्रमाणे हजारो शेतकरी वंचित राहले असल्याने त्यांनी कृषी विभागाकडे विमा कंपनीविरोधात लेखी स्वरुपात तक्रारी सादर केलेल्या आहेत. तर विमा तक्रारींचे निरसन करण्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुका स्तरीय समिती असते. परंतु तालुक्यात हजारो तर जिल्ह्यात लाखो तक्रारी प्राप्त असतांनादेखील समितीने कुठलीच बैठक आजपर्यंत घेतली नसल्याने प्रशासन शेतकरी प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप विनायक सरनाईक यांनी केला होता. वंचित शेतक-यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यात यावी, तुटपुंजी रक्कम प्राप्त शेतक-यांना उर्वरीत विमा रक्कम अदा करण्यात यावी, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण समिती बैठकीत आढावा घेऊन राज्यस्तरीय समितीला व शासनास अहवाल सादर करण्यात यावा, कमी पैसे रक्कम जमा झाल्याने याबाबतचा तफावत अहवाल बनवून शेतक-यांना पिक विमा रक्कम अदा करावी, कंपनीने नियम धाब्यावर ठेवत केलेल्या मनमानी कारभाराची कुठलाही ताळमेळ नसल्याची चौकशी करुण दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी कृषी कार्यालयाचा ताबा घेतला असून, असंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तहसीलदार डॉ.अजितकुमार येळे, समितीचे सचिव तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आज तातडीने बैठक घेतली. तसेच, बैठकीला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, जोपर्यंत इतर मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यावेळी विनायक सरनाईक, नितिन राजपुत, रामेश्वर चिकणे, भारत खंडागळे, अनिल चव्हाण, रवि थोरात, औचितराव वाघमारे, रुषी वाघमारे, रमेश पवार, विठ्ठल परीहार, नंदकिशोर सरनाईक, श्रावण बडगे, गोकुळसिंग पवार, विलास वसु, बाळासाहेब झगरे, दत्ता मोरे, गणेश ठेंग, अरुण पन्हालकर, सुधाकर तायडे, गणेश देशमुख आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी विभागात ठाण मांडून बसलेले आहेत.
पुढील दोन आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता!
पीकविमा कंपनी एआयसीने शेतकर्यांना पिकांच्या नुकसानीपोटी प्रीमिअमपेक्षाही कमी नुकसान भरपाई दिली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु झाले आहे. परंतु, तत्पूर्वी याप्रश्नी ‘ब्रेकिंग महाराष्ट्रने’देखील जोरदार आवाज उठविला होता. तसेच, आजच्या विनायक सरनाईक यांच्या आंदोलनालादेखील राज्यस्तरावर जोरदार कव्हरेज दिले आहे. त्याची दखल तालुका प्रशासनाने घेतली असून, याबाबत’ ब्रेकिंग महाराष्ट्र’ने चिखली तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, ते म्हणाले, की ज्या शेतकर्यांनी पीकविमा काढला होता. परंतु त्यांचा पीकविमा हा मिळाला नव्हता, त्या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जे निवेदन होते, व आपणही याप्रश्नी आवाज उठविला होता, त्याला तहसीलदार साहेब आणि मी संयुक्त बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निश्चित केले आहे. तसेच, पुढील दोन आठवड्यात राहिलेल्या पीकविम्याची रक्कम संबंधित शेतकर्याला मिळेल, असे संबंधित कंपनीने कळविले आहे, असे तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला सांगितले आहे.
——————-