मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर पोलिस ठाणेअंतर्गत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, किरकोळ वस्तूंसह कोंबड्या चोरण्याचे प्रकार होत असतानाच, आता शेती उपयोगी महागड्या साहित्याचीही चोरी ते करू लागले आहेत. या चोरट्यांना पोलिसांचा अजिबात धाक वाटत नसून, त्यांनी आम्हाला पकडून दाखवा, असे एक प्रकारे आव्हानच मेहकर पोलिसांना दिले आहे. तरीही पोलिस फक्त गुन्हे दाखल करून ढिम्म आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मेहकर तालुक्यामधे दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता चोरट्यांनी आपला मोर्चा कृषी साहित्याकडे वळविला आहे. पारडा येथील डिगांबर शिवराम तांगडे यांच्याकडे स्वत:चा ट्रॅक्टर आहे. त्यांच्या ट्रॅक्टरचे साहित्य शेतात ठेवलेले असते. त्याचप्रमाणे ट्रॅक्टरचा रोटाव्हेटरसुद्धा त्यांनी त्यांच्या शेतामध्ये ठेवलेला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जाऊन त्यांनी कृषी साहित्याची पूजा केली. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी सकाळी पाहिले असता, तो रोटाव्हेटर त्या ठिकाणी नव्हता, असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अगोदर गावातील सर्व ट्रॅक्टर्सवाल्या लोकांना कॉल करून विचारणा केली. परंतु कोणाकडेही रोटाव्हेटर आढळून आला नाही. त्यानंतर त्यांनी सदर चोरीची तक्रार मेहकर पोलिस स्टेशन येथे केली.
सदर चोरीचा तपास मेहकर पोलिस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे. शेतातील कामे तोंडावर आलेले असताना शेतकर्याचा रोटाव्हेटर चोरीस गेल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, व शेतातील कामास विलंब होत आहे. सदर रोटाव्हेटर शक्तिमान कंपनीचा असून, कोणालाही आढळून आल्यास किंवा कोणाकडे विक्रीसाठी आल्यास त्यासंबंधी माहिती मेहकर पोलीस स्टेशन येथे कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.