– मेहकर विधानसभा मतदारसंघातून लढणार, आणि विजय खेचून आणणार?
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – राज्याचे माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी अखेर शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश करून भगवाध्वज हाती घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती आज ‘मातोश्री’वर ‘शिवबंधन’ बांधले. खरात हे मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून, कट्टर शिवसैनिक व मतदारसंघात निर्माण झालेली परिवर्तनाची लाट त्यांना विजयश्री प्राप्त करून देणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेवर गाढ विश्वास असलेले सिद्धार्थ खरात यांच्यासारखे उच्चशिक्षीत नेतृत्व मेहकर-लोणार तालुक्याच्या विकासाची तहान निश्चित भागवेल, असा विश्वास प्रत्येक गावोगावी यानिमित्ताने निर्माण झालेला आहे.
मेहकर व लोणार या तालुक्यांचा विकास पाहिजे तसा होऊ शकला नाही. या विकासाला चालना देण्यासाठी माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे निश्चित केले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना आपलेसे वाटणारे त्यांचे नेतृत्व आहे. विकासापासूर दूर असलेल्या या मतदारसंघात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी तसेच आगामी काळात राज्यात शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेसची सत्ता येण्याचे दाट संकेत पाहाता, खरात यांना चांगली कामे मार्गी लावण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आज काँग्रेसचे युवा नेते सुमित सरदार यांच्यासह इतरांनीदेखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत, शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती. सद्या शिवसेना (ठाकरे) पक्षात जोरदार इनकमिंग वाढले असून, यापूर्वी बुलढाणा वन मिशन तथा शाहू परिवाराचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांनीदेखील शिवबंधन बांधलेले आहे. यापैकी कितीजण शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार तथा शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना मोठा लीड मिळू शकला नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना या मतदारसंघात चांगली मते मिळालीत. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कट्टर शिवसैनिक व स्थानिक नेत्यांनी तुपकरांचे काम केल्याचे बोलले जात असून, त्यामुळे विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात ना. जाधव यांना लीड मिळू शकला नव्हता. आता शिवसेना (ठाकरे) पक्षाने येथे स्वतःचा उमेदवार दिल्याने कट्टर शिवसैनिक व ठाकरे गटाचे पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते हे सिद्धार्थ खरात यांच्या विजयासाठी झुंजणार आहेत. मेहकर हा मतदारसंघ शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा असल्याने मेहकरची जागा उद्धव ठाकरे यांना निश्चित जिंकता येईल, अशी राजकीय धुरिणांची माहिती आहे.
———-
शिवसेना (ठाकरे) पक्षात जोरदार इनकमिंग
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात सद्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे दिसत आहे. आज, ३ सप्टेंबर रोजी मुंबई येथे मातोश्रीवर मंत्रालयीन माजी सनदी अधिकारी सिध्दार्थ खरात यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. सुमित सरदार, मेहकरचे माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर महाराज, खामगावच्या माजी विस्तार अधिकारी श्रीमती उर्मिला ढाकरे, जळगाव जामोदचे संतोष दांडगे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधले. यावेळी विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख आशीष राहाटे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.