जिल्ह्यात पावसाने हाहाकार?; नदी, नाले काठोकाठ भरले; सोयाबीन, कपाशी, तुरीचे नुकसान!
– मंडळस्तरावरील पर्जन्यमापक यंत्र उठले शेतकर्यांच्या जीवावर!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात कोसळधार पाऊस पडत आहे, या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, जिल्ह्यातील अनेक गावांचा या पुरामुळे संपर्क तुटला आहे. पाऊस थांबायला तयार नसल्याने कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांना जबर फटका बसला असून, अनेकांची शेती खरडून गेली आहे. मेहकर, चिखळी, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांसह मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा परिसरात १ सप्टेंबररोजी रात्री ढगफुटीसारखा पाऊस पडला. या पावसामुळे येथील उतावळी प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो झाला असून, विविध पिकांसह शेतीचेदेखील नुकसान झाले आहे. एवढा पाऊसही फक्त ५३ मिमी पावसाची नोंद वरवंड मंडळस्तरावर झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, पाऊस मोजण्यासाठीचे पर्जन्यमापक यंत्र मंडळस्तरावरील गावाला बसवण्यात आले आहे; परंतु तेथे पाऊस कमी झाल्यास त्याचा फटका इतर गावांना बसत आहे. त्यामुळे प्रत्येक गावस्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी होऊ लागली आहे. खडकपूर्णा प्रकल्प भरल्याने पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. येळगाव धरण ओव्हर फ्लो झाले असून, पैनगंगेच्या पुराचे पाणी शेतात धुसल्याने सोयाबीनसह शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
जून, जुलै महिन्यात जेमतेम पडलेल्या पावसाने ऑगस्टचा शेवटचा आठवडा व सप्टेंबर चालू महिन्यात चांगलेच झोडपणे सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून दिवसांपासून धो धो पाऊस बरसत आहे. या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून, नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने पिके खरडून गेली आहेत. संग्रामपूर तालुक्यातील वाणच्या पुराने तेथील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला होता. पावसामुळे पूर आल्याने काल, दि. २ सप्टेंबररोजी मलकापूर तालुक्यातील दोघेजण वाहून गेल्याची माहिती आहे. पाऊस उसंत घ्यायला तयार नसल्याने कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे तर नदी व नाल्याकाठची शेतीसुद्धा खरडून गेली असून, काही शेतात मोठ्या प्रमाणात पाणीदेखील साचले आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशासह परिसरातील पारखेड, नायगाव देशमुख, मोहना, मांडवा, वडाळीसह काही गावात ढगफुटीसारखा पाऊस झाला. तसेच, लोणार तालुक्यातील रायगाव, सावरगाव मुंढे, गांधारी, नांद्रासह काही गावातही ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसामुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सदर नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. चिखली तालुक्यातील मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, मेरासह इतर गावांतही जोरदार पाऊस झाला असून, छोटेमोठे प्रकल्प भरलेले आहेत.
या पावसामुळे देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्प ओकला असून, सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना उपविभागीय अभियंता लोहार यांनी दिल्या आहेत. देऊळगाव साखरशा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडूनही वरवंड मंडळ स्थळावर केवळ ५३ मिमी. पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. देऊळगाव साखरशा गाव हे डोंगराळ भागात असून, येथे उतावळी प्रकल्प आहे. त्यामुळे येथे पावसाचा जोर जरा जास्तच असतो. परंतु, मंडळस्तरावरील पर्जन्यमापक यंत्र हे वरवंड या मंडळस्तरीय गावी बसविलेले असल्याने येथे पडणारा पाऊसच ग्राह्य धरल्या जातो. त्यामुळे याचा फटका सहाजीकच इतर गावांना बसतो. त्यामुळे सदर पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक गावात बसवावे, अशी मागणी जोर धरू लागली. प्रत्येक गावात सदर यंत्र बसवण्याचे शासनाने गेल्यावर्षी घोषितदेखील केले होते.
‘येळगाव’ धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडल्याने पैनगंगा खवळली; ‘खडकपूर्णा’तूनही पाणी सोडले!