Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन, शेतकर्‍यांना कर्जमाफी, महाराष्ट्रात जातीनिहाय गणना करणार!

- महाविकास आघाडीचा 'महाराष्ट्रनामा' नावाने जाहीरनामा प्रसिद्ध

– महिलांना दरमहा ३ हजार रूपये देणार, राज्य सरकारमधील दोन लाख रिक्त जागा भरणार!
– ‘महायुती’ने आमच्याच योजना कॉपी केल्या; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची महायुतीवर टीका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करणे, शेतकर्‍यांचे तीन लाखापर्यंतचे सर्व कर्ज माफ करणे, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रूपये देणार, महिलांना मोफत बस प्रवास, मुलींसाठी निर्भय महाराष्ट्र धोरण, गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक मोफत लस, मासिक पाळीच्या दिवसात २ दिवस ऐच्छिक रजा, नियमित कर्ज परतफेडीवर शेतकर्‍यांना ५० हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान, राज्य सरकारी रिक्त जागांची तातडीने भरती, सर्व आस्थापनांतील महत्वाच्या जागा एमपीएससीमार्फत भरणार, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, अशा महत्वपूर्ण घोषणा महाविकास आघाडीने आपल्या ‘महाराष्ट्रनामा’ नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात केल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाआघाडीचे प्रमुख नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या जाहीरनाम्यातील घोषणांची माहिती दिली. भाजपने आपला जाहीरनामा आज सकाळी प्रसिद्ध केला. त्यानंतर महाविकास आघाडीनेदेखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, युवक शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महायुतीने आमच्याच योजना कॉपी केल्या, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याप्रसंगी केला.

आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आमदार नाना पटोले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आमच्या पाच हमी महाराष्ट्रातील सर्वांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरतील. प्रत्येक कुटुंबाला अंदाजे ३ लाख रुपयांची वार्षिक मदत मिळणार आहे. आमची महालक्ष्मी योजना सर्व महिलांना आर्थिक मदत करेल. याअंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करणार आहोत. याबरोबरच स्वतंत्र बालकल्याण मंत्रालय स्थापन करण्याची, राज्य सरकार मधल्या अडीच लाख जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु करण्याची, युवा कल्याणासाठी युवा आयोग स्थापन करण्याची घोषणा, नवे औद्योगिक धोरण स्थापन करणार असल्याची घोषणा खरगे यांनी केली. राज्यात जातनिहाय जनगणना केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच संजय गांधी निराधार योजनेची मर्यादा २१ हजारांवरुन ५० हजार करणार, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित करण्यासाठी तातडीने पावले उचलणार, दरमहा ३०० युनिटपर्यंत वीजवापर असणार्‍या ग्राहकांचे १०० युनीटपर्यंतचे वीज बिल दरमहा माफ करणार असल्याचे आश्वासनदेखील या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
—–
Imageजाहीरनाम्यातील ठळक घोषणा
– कुटुंब रक्षणासाठी विमा – कुटुंबाला २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा.
– महालक्ष्मी योजना – महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये आणि महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा.
– कृषी समृद्धी – शेतकर्‍यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ. नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन
– युवकांना मदत – बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंतची मदत.
– समानतेची हमी – जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार.
– महिलांसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे बँक खात्यात रक्कम ठेवणार, १८ वर्षांनंतर १ लाख देणार
– एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून ४५ दिवसांत निकाल लावणार
– महाराष्ट्रात जातीनिहाय जनगनणा करणार
– महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार
– ६ गॅस सिलेंडर प्रत्येकी ५०० रुपयांत उपलब्ध करून देणार
– २५ लाखांचा आरोग्य विमा योजना लागू करणार
– प्रत्येक कुटुंबाला महिन्याला ३ लाखांची आर्थिक मदत
– सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
– २५ नगरपालिकांच्या न झालेल्या निवडणुका आमचे सरकार आल्यावर करणार.
– संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना दीड ऐवजी दोन हजार रुपये.
– राज्यातील अडीच लाख सरकारी रिक्त पदे भरणार
– राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार
– महिला कर्मचार्‍यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये २ दिवसांची ऐच्छिक रजा.
– शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार
– महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
– सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, महायुतीने आमच्याच योजना कॉपी केल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना केली जाईल. कालपासून तेलंगाणात जातिनिहाय जनगणना सुरू झाली आहे. मोदी म्हणाले, विरोधक जातीजाती वाद लावत आहेत. पण ही जातीनिहाय जनगणना जातीजातींमध्ये फूट पाडण्यासाठी नसून, कोणत्या जातीत किती लोक मागासलेले आहे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आहे. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकावर आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार आहोत. उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी नवीन औद्यागिक धोरण आखले जाईल. दादर येथील चैत्यभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधणे ही आमची प्राथमिक पसंती राहील, असेही खरगे म्हणाले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!