– मासरुळ, धामणगाव, डोंगरुळ, वरूड, सोयगाव, पांगरखेड, शेकापूर व जामठी येथे जनआशीर्वाद दौर्याला व्यापक प्रतिसाद
चिखली (तालुका प्रतिनिधी) – जनतेची सेवा व आपल्या परिसराचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी राजकारणात प्रवेश केला. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने पाच वर्षांपूर्वी चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याच्या विधानसभेत करण्याची मला संधी मिळाली. या तुमच्या उपकाराचे ऋण जास्तीतजास्त विकासकार्याच्या माध्यमातून फेडण्याचा मी प्रयत्न केला. या प्रयत्नाला आणखी प्रोत्साहन मिळावे, याकरिता पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. अजून बरीच कामे मासरूळ परिसरात करावयाची आहेत; त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ मला नितांत गरजेची असून, तुमच्या प्रत्येकाचे मत मला विकासकार्यासाठी बळ देणारे ठरेल; म्हणून पुन्हा एकवार मला आपल्या सेवेची संधी द्या, असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले. तर, महायुतीमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून जरी श्वेताताई महाले निवडणूक लढवत असल्या तरी त्यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात कधीही जात, धर्म आणि पक्षाचा भेद मानला नाही. आपली समस्या घेऊन आलेल्या कोणत्याही जाती – धर्माच्या व पक्षाच्या नागरिकाला व कार्यकर्त्याला न्याय देण्याचाच नेहमी प्रयत्न केला; त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नाची जाण ठेवून मसरूळ परिसरातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने या निवडणुकीत श्वेताताई महाले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी केले. आ. महाले यांच्या जन आशीर्वाद दौर्यानिमित्त आयोजित गावभेटीमध्ये मासरूळ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पीरिपा, आरपीआय व रयत क्रांती संघटना महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ आयोजित जनआशीर्वाद दौर्यादरम्यान आ. महाले यांनी मासरुळ, धामणगाव, डोंगरुळ, वरूड, सोयगाव, पांगरखेड, शेकापूर व जामठी येथे भेटी देऊन तेथील गावकर्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. गावोगावी स्थानिक युवक, महिला, शेतकरी, मागासर्गीय, अल्पसंख्यांक आदी प्रत्येक समाज घटकातून श्रीमती महाले यांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. भाजपा बुलढाणा तालुकाध्यक्ष एड. मोहन पवार, मंदार बाहेकर, चिखली शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पीरिपा, आरपीआय, रयत क्रांती संघटना या महायुतीमधील पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
तर, याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हा सचिव एड. सुनील देशमुख म्हणाले, की ग्रामीण भागाच्या समग्र विकासाची दृष्टी व तळमळ असलेल्या आ. श्वेताताई महाले यांनी मासरुळ परिसरात कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी खेचून आणत प्रत्येक गावामध्ये मूलभूत सुविधा निर्माण केल्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, रस्ते, वीज आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. याशिवाय ठीकठिकाणी सभामंडप, सामाजिक भावने, ग्रामपंचायत भवनाची निर्मिती करून उल्लेखनीय कार्य केले. तसेच, वैयक्तिक लाभाच्या योजनांचीदेखील प्रभावीपणे अंमलबजावणी केली. या सर्व विकासकार्याची परतफेड आ. श्वेताताई महाले यांना मतदानातून करावी, आणि पुन्हा आपल्या परिसराचा विकास करण्याची त्यांना संधी द्यावी, असे आवाहन एड. सुनील देशमुख यांनी केले.
सवणा ते अमडापूर पायीवारी करून श्वेताताईंच्या विजयासाठी बल्लाळदेवीला साकडे!