Breaking newsBuldanaBULDHANAHead linesVidharbha

‘येळगाव’ धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडल्याने पैनगंगा खवळली; ‘खडकपूर्णा’तूनही पाणी सोडले!

UPDATE : खडकपूर्णातून विसर्ग वाढविला..

दरम्यान, खडकपूर्णा प्रकल्पातून दुपारनंतर चार वाजता पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आला असून, १९ उघडलेल्या दरवाजांपैकी पाच दरवाजे १ मीटरने तर उर्वरित १४ दरवाजे ०.५० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खडकपूर्णा नदीपात्रात सद्या ५३५२९ क्युसेस वेगाने पाणी विसर्ग सुरू आहे. हे धरण ९३ टक्के भरले असून, धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरण प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा धोका पाहाता, सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.


– बुलढाणा मुख्याधिकार्‍यांनी देवेंद्र फडणवीसांचे आदेश धाब्यावर बसविल्याचा शेतीपिकांना फटका
– शेतकरी नेते विनायक सरनाईक भल्यापहाटे शेतबांधावर; पीक नुकसानीची पाहणी करून अधिकार्‍यांना धारेवर धरले!
– खडकपूर्णा धरणातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

सिंदखेडराजा/चिखली (अनिल दराडे/महेंद्र हिवाळे) – बुलढाणा जिल्ह्यातील मराठवाड्याला लागून असलेल्या घाटमाथावर कोसळधार पाऊस झाल्याने धरणक्षेत्रांत जोरदार पाण्याची आवक वाढली असून, त्यामुळे खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे हे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे खडकपूर्णा नदीकाठच्या गावांना सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, मुंबई येथील बैठकीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना येळगाव धरणाच्या स्वयंचलीत दरवाजांबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते. मुख्याधिकार्‍यांनी हे आदेश धाब्यावर बसविल्याने धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडले गेले असून, त्यामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. या पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतीपिकांची नासाडी झाली असून, पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकाची शंभर टक्के नासाडी झाल्याने नुकसान झालेले आहे. शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आज भल्यापहाटे शेतबांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली व शेतकर्‍यांना धीर देत अधिकार्‍यांना धारेवर धरले. सोयाबीनसह इतर पिकांच्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई मिळायलाच पाहिजेत, असे सरनाईक यांनी ठणकावले आहे.
शेतकरी नेते विनायक सरनाईक भल्यापहाटे शेतबांधावर.

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणार्‍या येळगाव धरणाच्या सांडव्यामध्ये ८० स्वयंचलीत दरवाजे बसवण्यात आले आहेत. धरण भरले की हे दरवाजे आपोआप उघडतात. त्यामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर येऊन बुलढाणा, चिखली, मेहकर तालुक्यातील शेतकर्‍यांचे शेतीपिकांचे अतोनात नुकसान होते. हे स्वंयचलीत दरवाजे बसविण्यापूर्वी बुलढाणा नगरपालिका पावसाचा अंदाज पाहून गेट खुले करत होती. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान टाळता येत होते. तसेच, या धरणाला सांडवादेखील नसल्याने नदीकाठच्या गावांना वारंवार पुराचा सामना करावा लागत आहे. हा प्रश्न नुकताच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उच्चस्तरीय बैठकीत मांडला असता, याच बैठकीला ऑनलाईन हजर असलेल्या जिल्हाधिकारी तसेच बुलढाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना उपमुख्यमंत्र्यांनी या स्वयंचलीत दरवाजांबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते. परंतु, मुख्याधिकार्‍यांनी काहीही कारवाई केली नसल्याने पुन्हा एकदा हे दरवाजे उघडले जाऊन पैनगंगा नदीला पूर आला असून, पुराचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात घुसलेले आहे. आज सकाळीच शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी शेतबांधावर जात पीक नुकसानीची पाहणी केली, व तेथूनच अधिकार्‍यांना फोन लावून चांगलेच धारेवर धरले. पूरस्थिती व पिकांचे नुकसान टाळायचे असेल तर धरणाला सांडवा असणे गरजेचे असून, जेव्हापासून सांडव्यात गेट बसवले तेव्हापासून शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे, असे सांगून, सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले असून, शेतीपिकांच्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.

खडकपूर्णातून पाणी विसर्ग सुरू!

खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा नदी व उपनद्या पूर्ण प्रवाहाने वाहत आहे. खडकपूर्णा पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी व पाणलोट क्षेत्रातील होणार्‍या पर्जन्यमानानुसार धरण परीचलन सूचीअंतर्गत पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. करिता खडकपूर्णा नदी काठच्या गावांतील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे. दरम्यान, आज (दि.३) सकाळी पाच वाजता खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे हे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यानंतर प्रकल्पातून २५०.२५ क्युसेस वेगाने विसर्ग सुरु झाला होता. दुपारी चार वाजेनंतर पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आल्याची माहिती खडकपूर्णा नियंत्रण कक्षाने दिली आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.
———–

जिल्ह्यात पावसाने हाहाकार?; नदी, नाले काठोकाठ भरले; सोयाबीन, कपाशी, तुरीचे नुकसान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!