भाऊ, ताईच्या गडात दादाची डॅशिंग एन्ट्री; भीम आर्मीच्या परिवर्तन रॅलीने प्रस्तापितांना हादरा!
बुलढाणा/चिखली (संजय निकाळजे) : चिखली विधानसभा मतदारसंघ दिग्गज, प्रस्थापितांचा समजला जातो. चिखली पुरतेच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणाची दिशा येथूनच आखल्या जाते. कधी भाऊ तर कधी ताई(भाऊच्या अगोदरही ताई नंतरही ताई) असेच राजकारण चिखलीचे सीमित राहिले आहे. मात्र या भाऊ, ताईच्या गडात एका दादाची दमदार एन्ट्री झाली परिवर्तन रॅलीच्या निमित्ताने. भीम आर्मीच्या माध्यमातून सतीश दादा पवार यांनी काढलेल्या या रॅलीमुळे प्रस्थापितांना चांगलाच हादरा बसला. यावेळी बौद्ध बांधवांसह बहुजनांनी एकत्र येऊन प्रस्थापितांचा गड काबीज करावा असे आवाहन सतीश दादा पवार केले.
शनिवार, ३१ ऑगस्टरोजी सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी भीम आर्मीचे वादळ चिखली शहरात महारॅलीद्वारे घोंगावले. जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात या विशाल रॅलीच्या माध्यमातून प्रस्थापितांचा गड असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघात भीम आर्मीची महारॅली निघाली. बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सांगताना त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना हद्दपार करण्यासाठी व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी चिखलीत कार्यालय उघडल्याचे सांगून बौद्धबांधवांसह बहुजनांनी एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीत प्रस्थापितांचा हा गड काबिज करण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन केले. बुलडाण्यातील भीम आर्मीच्या जिल्हा संपर्क कार्यालयापासून जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात शेकडो गाड्यांचा ताफा चिखलीकडे सकाळी रवाना झाला. चिखलीत पोहोचल्यानंतर प्रारंभी शहीद कैलास पवार यांच्या स्मारकास सतीश पवार यांच्यासह उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. शहीद कैलास पवार अमर रहे…, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह, महात्मा फुले यांचा जयघोष करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी आपकी बार, बौद्ध आमदार.. अशा घोषणा दिल्या. पुढे मोटारसायकल रॅलीसह मधोमध सतीश पवार हाती निळा झेंडा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन जनतेला सामाजिक एकतेचा संदेश देत होते.
सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत भीम आर्मीचा नारा पोहोचवण्याकरिता जनतेचे सेवक म्हणून भीम आर्मी सर्वसामान्य व्यक्तींची समस्या सोडविण्यास तत्पर राहील, अशी ग्वाही सतीश पवार यांनी यावेळी दिली. तर जितनी जिनकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या तत्त्वानुसार सात विधानसभेसाठी भीम आर्मीतर्फे विचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परिवर्तन महारॅलीदरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीचे चिखली येथील भीम आर्मीच्या संपर्क कार्यालयावर आगमन झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी कार्यालयाचे फित कापून उद्घाटन केले. याप्रसंगी सामाजिक चळवळीमध्ये योगदान दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाला राऊत, अर्जून खरात, ॲड. कैलास कदम, प्रा. किरण पवार, सतीश गुरुचवळे, राहुल दाभाडे, संतोष कदम, राहुल वानखेडे, जितेंद्र खंडेराव, अमोल इंगळे, सुरेश जाधव, शरद खरात, खरे, माधवराव वाकोडे, संजय जाधव संजय वानखडे, नदीमभाई, विजय दोडे, अनिल शिखरे, अनिल खरात, हर्ष निकाळजे, सुयश गवई, संघपाल मघाडे, योगेश खंडारे, राजू मघाडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीमधील सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, शाखा पदाधिकारी व शेकडोंच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.