– ‘साहेबांना’ शेतकर्यांचा कळवळा नसून पीकविमा कंपनीचा पुळका : विनायक सरनाईक
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या चार महिन्यांपासून पीकविमा कंपनी शेतकर्यांच्या खात्यावर पैसे टाकत नाही, ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे, कंपनीला सर्व पैसे प्राप्त आहेत. क्लेमसुद्धा सेटल आहेत. परंतु पीकविमा कंपनीला धारेवर धरून पैसे शेतकर्यांच्या खात्यात टाकायचे सोडून जो तो सत्ताधारी उठतो आणि पुढची तारीख घेतो, यामुळे या सत्ताधारी नेत्यांवरील शेतकर्यांचा विश्वास आता उडला आहे. या नेत्यांना पीकविम्यापासून वंचित शेतकर्यांचा कळवळा नसून, विमा कंपनीचा जास्त पुळका असल्याचा आरोप शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केला आहे. मुद्दामहून कृषीमंत्री यांचे नाव घ्यायचे, वेळ मारून न्यायची. परंतु, आता जनता तुमच्या या वेळीवेळी दिलेल्या आश्वासनांना कंटाळली असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची धास्ती या नेत्यांनी घेतली आहे. तुपकरांचे आंदोलन यापूर्वीसुद्धा यशस्वी ठरले असल्याने आतासुद्धा ठरले तर आपल्याला विधानसभेत फटका बसायला नको, यासाठी पुढच्या तारखेचा सावध पावित्रा घेतला जात असल्याचे सांगून, सरनाईक यांनी शेतकर्यांचे प्रश्न सोडवा, उगाच खोट्या गोष्टी शेतकर्यांमध्ये पेरू नका, असा टोला सत्ताधारी आमदारांना हाणला आहे. पीकविम्याचे श्रेय घ्यायचे तर खुशाल घ्या, पण आमच्या शेतकर्यांच्या खात्यावर मात्र पीकविम्याची रक्कम द्या, अशी मागणीही सरनाईक यांनी केलेली आहे.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत मुंबईत बैठक घेऊन, आणि कृषीमंत्र्यांनी आदेश देऊनही ३१ ऑगस्टच्या दिलेल्या तारखेला शेतकर्यांना पीकविमा मिळालेला नाही. त्यानंतर सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एका बैठकीची व कृषीमंत्र्यांशी बोलल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी आमदारांवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. कंपनीला हे पुढारी मुद्दामहून सहकार्य करीत आहेत. वेळ मारून नेत आहेत, असा आरोप करत शेतकरी नेते सरनाईक म्हणाले, की शेतकर्यांना आता या तारीख पे तारीखवर शंका येत असून, मुद्दामहून पीकविमा लांबवायचा, आणि निवडणुकीच्या तोंडावर टाकायचा घाट घातला जात आहे. आता पीकविमा मिळवून देण्यासाठी पुन्हा काही सत्ताधारी आमदार ‘तारीख पे तारीख’ व बैठकांचा घाट घालत आहे. खरे तर रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर त्यांना ही जाग आली आहे. खरे तर तुपकर हे गेल्या अनेक दिवसांपासून शांत आहेत. परंतु जिल्ह्यातील नेत्याची ३१ ऑगस्टची डेडलाईन संपल्यानंतर तुपकर मात्र आक्रमक होवून अॅक्शन मोडवर आले आहेत. तुपकरांनी आता तुमची वेळ संपल्याचे सांगत, आता आम्हीच पीकविमा कंपनीला वठणीवर आणतो सांगितल्याने आता काही नेते मुद्दामहून कंपनीला धारेवर धरल्याचे सांगत, पुढची तारीख शेतकर्यांमधे पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जनता आता यांच्या तारखांना कंटाळली आहे. शेतकर्यांना पीकविमा फक्त रविकांत तुपकर हेच मिळवून देतील, असेही सरनाईक यांनी सांगितले.
अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी रविकांत तुपकरांनी केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी
गेल्या दोन् दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने शेतीपिकांचे, शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच पैनगंगा नदीला आलेल्या पुराने अनेक ठिकाणी शेतजमिमी खरडून गेल्या आहे. या झालेल्या नुकसानीची शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पाहणी केली. चिखली तालुक्यातील पेठ, उत्रादा, सोमठाणा, दिवठाणा परिसरात तुपकरांनी पाहणी करून शेतकर्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची सरकारने तातडीने १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तुपकरांनी केली आहे. शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू होत आहे. आंदोलनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही पाहणी केली. त्यानंतर ते सिंदखेडराजाकडे अन्नत्याग आंदोलनासाठी रवाना झाले होते.