Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

सिंदखेडराजात तुपकरांचे ‘अन्नत्याग’ सुरू; रविवारी समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घुसविणार!

– शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी व्हा; रविकांत तुपकरांचे आवाहन
– ‘सपोर्ट फॉर फार्मर’; राज्यभर टप्प्याटप्प्याने पेटणार आंदोलन
– आंदोलन संपत नाही तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही – रविकांत तुपकर

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिजाऊ राजवाडासमोर आपल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. आज, दि. ४ सप्टेंबररोजी रविकांत तुपकर शेतकर्‍यांसह सिंदखेडराजात पोहोचले. राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन त्यांनी आंदोलनस्थळी आपले अन्नत्याग आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकर्‍यांनी उपस्थित राहून तुपकरांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. रविकांत तुपकर म्हणाले की, ही लढाई एकट्या रविकांत तुपकरांची नसून, तमाम शेतकर्‍यांच्या न्याय हक्काची ही लढाई आहे. त्यामुळे आता नुसता पाठिंबा देऊ नका तर या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या आंदोलनाचा श्वास सोयाबीन – कापूस आहे. आता आपला कोणी नेता नाही त्यामुळे आपला लढा आपल्यालाच पुढे न्यावा लागणार आहे. आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचे नाही, असे सांगत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने पेटणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

आंदोलनाला सुरूवात करण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व त्यानंतर ते सिंदखेडराजात पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ मोठ्या संख्येने शेतकरीदेखील येथे दाखल झाले. त्यामुळे आंदोलनस्थळाला मेळाव्याचे स्वरूप आले होते. शेतकर्‍यांशी संवाद साधताना रविकांत तुपकर म्हणाले की, हे सरकार वारंवार सांगत असते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो. त्यामुळे छत्रपती शिवरायांना घडवणार्‍या राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानासमोर हे आंदोलन करीत आहोत, या सरकारला सुबुद्धी दे अशी प्रार्थना राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी केली असून, सोयाबीन- कापसाच्या आंदोलनाचे केंद्र आता सिंदखेडराजा करायचे आहे, असे रविकांत तुपकरांनी स्पष्ट केले. सोयाबीन-कापूस तसेच पीकविमा, शेतकरी, पीकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १०० टक्के नुकसान भरपाई, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकर्‍यांच्या न्यायहक्काच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. त्यामुळे या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका. जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही, असेही तुपकरांनी सांगितले. अंबानी-अदानीचे कर्ज माफ करायला सरकारजवळ पैसा आहे, मात्र शेतकर्‍यांचे कर्ज माफ करायला पैसा नाही का..? असा सवाल यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. शेतकर्‍यांच्या खात्यात पीकविमा अद्याप जमा झाला नाही. नेते तारखावर तारखा देत आहेत, ३१ ऑगस्टपर्यंत पीकविम्याची रक्कम जमा होईल, असे नेते सांगत होते. तोपर्यंत आपण वाट पहिली मात्र आता आपली सहनशिलता संपली आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिजाऊंचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. ही लढाई माझी एकट्याची नसून, सर्व शेतकर्‍यांचा हा लढा आहे. त्यामुळे सर्वांना या आंदोलनात सहभागी व्हावे लागणार आहे. शेतकर्‍यांची एकजूट सरकारला झुकायला भाग पडेल, असा विश्वास व्यक्त करत रविकांत तुपकर यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने पुढे नेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.सिंदखेडराजा येथे आंदोलन सुरू असले तरी या आंदोलनाची धग राज्यभर पोहोचणार आहे आणि राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळी आंदोलने केली जाणार असल्याचेदेखील रविकांत तुपकरांनी सांगितले. दि. ५ सप्टेंबररोजी सर्व शेतकरी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देतील. दि. ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या गावागावात प्रभातफेर्‍या निघतील. दि. ७ सप्टेंबरला गावागावात ग्रामपंचायतचे ठराव घेतल्या जाणार आहे, तर दि. ८ सप्टेंबरला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी रविकांत तुपकर यांनी केली.


राज्यभर आंदोलन पेटणार

तर समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घेऊन चक्काजाम करणार!

आजपासून रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे तर उद्या, दि. ५ सप्टेंबरपासून वेगवेगळे आंदोलने होणार आहे. उद्या, ५ सप्टेंबरला शेतकरी आपापल्या भागातील तहसीलदार व जिल्हापातळीवर जिल्हाधिकार्‍यांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. दि. ६ सप्टेंबरला गावागावात प्रभारतफेरी निघेल. ७ सप्टेंबरला ग्रामपंचायतचे ठराव घ्यावे, असे आवाहनही तुपकर यांनी केले आहे. दि. ८ सप्टेंबरला रविवारी सगळीकडे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. समृध्दी महामार्गदेखील अडवू, समृध्दी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसू, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.


सपोर्ट फॉर फार्मर!

गावगाड्यातील व खेड्यापाड्यातील शेतकरी- शेतमजुरांनी शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला समर्थन दिले पाहिजे. तसेच शहरी भागातील नागरिकांनीदेखील शेतकर्‍यांच्या लढाईला समर्थन देणे गरजेचे आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन द्या, व्हिडिओ करा अाणि सोशल मीडियावर ते व्हायरल करा, सपोर्ट फॉर फार्मर अशी एक सोशल मीडियावर, राबवा असे आवाहनदेखील रविकांत तुपकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!