Breaking newsBuldanaBULDHANAVidharbha

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दाणादाण; १२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

– पाच तालुक्यांत नुकसानच नाही; मेहकर, लोणारमध्येही जेमतेम!
– शेतकरी नेते रविकांत तुपकर, आ. डॉ. शिंगणे, आ. रायमुलकरांनी केली नुकसानीची पाहणी, म्हणाले खचू नका, आम्ही सोबत आहोत!
– पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत तरी कोठे? शेतकर्‍यांचा सवाल!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने कहर केला असून, दि. २ व ३ सप्टेंबररोजी अतिवृष्टीसह तुफान पाऊस पडला. या पावसामुळे जवळजवळ १२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये काही शेतजमीनसुद्धा खरडून गेली आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, मका, उडीद, मूग यासह इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. तर पाच तालुक्यांत नुकसानच नसल्याचे अहवालातून दिसत असून, ढगफुटी झालेल्या मेहकर व लोणार तालुक्यातही नुकसानीचा आकडा कमीच आहे. एकंदरीत हा प्राथमिक अंदाजीत अहवाल असून, यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मेहकरचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी लोणार तालुक्यातील नुकसानीची आज (दि.४) पाहणी केली. तसेच, शेतकरी नेते रविकांत तुपकर व आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. खचून जाऊ नका, आम्ही सोबत आहोत असा विश्वासदेखील या नेत्यांनी शेतकर्‍यांना दिला. जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला असताना व शेतकरी नेस्तनाबूत झाला असताना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री दिलीप वळसे पाटील नेमके आहेत तरी कुठे? असा संताप आणणारा सवाल आता शेतकरी विचारत आहेत.

जून, जुलै महिन्यात पाऊस जेमतेम असताना गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने चांगलीच परेड घेतल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील बरेच प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यात २ व ३ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीसह धडाकेबाज पाऊस बरसला. या पावसामुळे नदी, नाले काठोकाठ भरले. पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, तूर, उडीद, मूग यासह इतर असे ११ हजार ६०९ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये मेहकर तालुक्यातील ४८ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील ८ बाधीत गावातील ७५० शेतकर्‍यांचे ३ हजार ३५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर चिखली तालुक्यातील ३२ बाधित गावातील ४ हजार २५० शेतकर्‍यांचे २ हजार १५० हेक्टर, मोताळा तालुक्यातील ३१ बाधित गावातील २१७५ शेतकर्‍यांचे ४ हजार ६२० हेक्टर, खामगाव तालुक्यातील २५ बाधित गावातील ४ हजार शेतकर्‍यांचे १ हजार ७०० हेक्टर, शेगाव तालुक्यातील २० बाधित गावातील १ हजार ५०० शेतकर्‍यांचे ९५० हेक्टर, नांदुरा तालुक्यातील १८ गावातील २ हजार ८०० शेतकर्‍यांचे १ हजार २०० हेक्टर, मेहकर तालुक्यातील ६ बाधित गावातील ३६३ शेतकर्‍यांचे ३७९ हेक्टरचे नुकसान झाले असून, यामध्ये ४८ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. लोणार तालुक्यातील ५ बाधित गावातील ५८७ शेतकर्‍यांचे २६० हेक्टरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. विशेष म्हणजे, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात मात्र पावसामुळे काहीच नुकसान झाले नसल्याचे या प्राथमिक अहवालातून दिसून येते. मेहकर व लोणार तालुक्यातदेखील नुकसानीचा आकडा फारच कमी असल्याचेही अहवालातील आकडे सांगतात.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा परिसर व लोणार तालुक्यातील नांद्रा मुंडेसह परिसरात १ सप्टेबररोजी रात्री ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. दरम्यान, लोणार तालुक्यातील नुकसानीची आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी आज, ४ सप्टेंबररोजी पाहणी केली. खचून जावू नका, आम्ही सोबत आहोत असा धीर त्यांनी शेतकर्‍यांना दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर काळेसह तलाठी, ग्रामसेवकसह कर्मचारी, जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, माजी उपसभापती भगवान कोकाटेसह शिवसेना पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. एकंदरीत हा नुकसानीचा प्राथमिक अंदाजीत अहवाल असून, यामध्ये वाढदेखील होऊ शकते, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला सांगितले. जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला असून, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याची एवढी भयावह परिस्थिती असताना जिल्ह्याचे पालकत्व घेतलेले पालकमंत्री दिलीप वळसे पाटील मात्र नेमके आहेत तरी कोठे? असा संतप्त सवाल शेतकरी आता विचारू लागले आहेत. याबाबत तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.

सिंदखेडराजात तुपकरांचे ‘अन्नत्याग’ सुरू; रविवारी समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घुसविणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!