शेणफडराव घुबे म्हणजे संकल्पपूर्तीसाठी झटणारा ध्येयवेडा माणूस – डॉ. अशोकराव खरात
– दादांमुळेच गावकुसातील बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली – ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राजकारण, शिक्षण, कृषी व अध्यात्मिक क्षेत्रात काम करून नव्यापिढीसाठी आभाळाएवढे कार्य उभे करणारे शेणफडराव घुबे म्हणजे संकल्पपूर्तीसाठी झटणारे ध्येयवेडे व्यक्तिमत्व आहे, असे प्रतिपादन बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अशोकराव खरात यांनी केले. तर शेणफडराव घुबे (दादा) यांच्यामुळे बहुजन समाजाच्या खेड्यापाड्यातील लेकरांना शिक्षणाची दारे खुली झालीत. त्यांनी एक पिढी घडवलीच नाही तर नव्यापिढीला त्यांच्या चारित्र्यातून संघर्षाची, लढण्याची प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे संपादकीय संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी केले.
बुलढाणा येथील रेसिडेन्सी हॉटेलच्या सेन्ट्रल हॉलमध्ये ज्येष्ठ नेते तथा शिक्षण, राजकारण, समाजकारणातील पितृतुल्य व्यक्तिमत्व शेणफडराव घुबे यांचा एकाहत्तरीनिमित्त अभीष्टचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपल्या भाषणांतून उजाळा दिला. याप्रसंगी डॉ.खरात व शिवश्री मिसाळ हे बोलत होते. बुलढाणा येथील दैनिक गुड इव्हेनिंग सिटीचे मुख्य संपादक व बुलढाणा सिटी न्यूज चॅनेलचे चीफ एडिटर रणजितसिंह राजपूत यांनी व त्यांचे सहकारी बुलढाणा मेडिकल असोसिएशनचे सचिव गजानन शिंदे, तालुका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम देवकर, बुलढाणा येथीलच विधीज्ज्ञ व सामाजिक रचनेत अग्रेसर असणारे जेष्ठ विधिज्ज्ञ जयसिंहबापू देशमुख व जिल्ह्यातील सदाबहार व्यक्तिमत्त्व इंजिनिअर विजयसिंह राजपूत यांच्या समन्वयाने या अतिशय भावस्पर्शी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याच्या शिक्षणक्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्त्व राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक पी. डी. सपकाळ हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यातील जेष्ठ हृदयरोगतज्ज्ञ तथा लद्धड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉ.पंकज लद्दड, बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजय सावळे, जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, महिला सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गिते, व महाराष्ट्र ब्रेकिंग मीडिया ग्रूपचे संपादकीय संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या अभीष्टचिंतन सोहळ्याचे सत्कारमूर्ती शेणफडराव घुबे यांचे मान्यवरांसह कार्यक्रमस्थळी पदार्पण होतांना सनई चौघड्याच्या मंजूळ स्वरात तुतारीच्या निनादात राजेशाही थाटात पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रणजितसिंह राजपूत यांनी शब्दसुमनांनी सर्वांचे स्वागत केले व आयोजकांच्यावतीने उपस्थित मान्यवरांना फेटे बांधून त्यांचे पुष्पहारांसह शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सत्कारमूर्ती शेणफडराव घुबे उर्फ दादासाहेब यांचे फेटा बांधून व हार अर्पण करून हृदय स्वागत व सत्कार करण्यात येऊन अभीष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. पुरुषोत्तम देवकर यांनी प्रास्ताविकातून शेणफडराव घुबे (दादा) यांच्या कार्यावर प्रकाश टाकून बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला आलेला माणूस समाजासाठी स्वतःला वाहून घेतो, तीन भावंडांचे ३१ जणांचे हे एकत्रित कुटुंब कायम समाजाच्या सुखदुःखाच्या समयी धाऊन जाते, अशा या कुटुंबाची ओळख समाजापुढे आणणे हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगून डॉ. देवकर यांनी शेणफडराव घुबे यांचे अभीष्टचिंतन केले. प्रमुख अतिथी असलेले जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अशोकराव खरात म्हणाले की, शेणफडराव घुबे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल जाणून होतो, शेतकर्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक रूप धारण करून समोरच्या व्यक्तीशी तात्विक वाद घालण्याची त्यांची भूमिका ही शेतकर्यांबद्दल असलेला कळवळा दर्शविते. मग ते शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी असो की, शेतमालाच्या भावाचे आंदोलन असो. शासनातील प्रशासनातील किंवा सरकारमधील वरिष्ठांसमोर शेतकर्यांची बाजू लावून धरून किंवा आपली बाजू पटवून देऊन शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. शेतकर्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा अजितदादांपासून देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत रेटून, त्यावर विचार करण्यासाठी सरकारला बाध्य केले. परंतु लाडकी बहीण योजना पुढे आल्यामुळे त्यांच्या प्रयत्नात किती यश मिळेल, याबाबत डॉ. खरात यांनी साशंकता व्यक्त केली. असे असले तरी न्यायालयात जाऊन शेतकर्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड म्हणजे एखाद्या कामाचा संकल्प करुन त्याच्या पूर्तीसाठी झटणारा ध्येयवेडा माणूस असेच मी म्हणेल, असे उद्गार डॉ. खरात यांनी काढले.
अध्यक्षीय भाषणात पी. डी सपकाळ सरांनी शेणफडराव घुबे यांच्या शैक्षणिक कार्याची व त्याबाबत असलेली त्यांची तळमळ ही वाखाणण्याजोगी असून, अविरत विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारा व सामाजिक चळवळीत महत्त्वाची भूमिका असलेलं व सर्वांना आवडणारं चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून शेणफडरावदादा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉ. पंकज लद्दड यांनी शेणफडरावांचे तोंड भरुन कौतुक करतांना सांगितले, की दादांचा दोन मिनिटाचा सहवास हा ऊर्जा देणारा व माणसाच्या ह्रदयात प्रचंड प्रेमाची अनुभूती देणारा असतो. अशी निर्मळ माणसं ही खर्याअर्थाने ईश्वराची देण असते, असे भावूक उदगार डॉ. पंकज लद्दड यांनी काढले. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गिते व शाहिनाताई पठाण यांनीही शेणफडरावदादांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याला उजाळा देऊन दादांचे अभीष्ट चिंतन केले. धार्मिक रूढीला फाटा देऊन आधुनिकतेची कास धरणारे, निराधार, वंचितांना आधार देणारे महिलांचा मानसन्मान करून गौरव करणारे दादा सर्वांना आपले आधारस्तंभ वाटतात. वसतीगृहातील विद्यार्थ्यांसोबत आपले जीवन व्यतीत करणारे दादा सर्वांनाच हवेहवेसे वाटतात, असे उद्गार प्रवीण गिते यांनी काढताना उपस्थितांची मने जिंकली. तर ब्रेकिंग महाराष्ट्रचे संपादकीय संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी आपल्या भावपूर्ण भाषणातून शेणफडरावदादांच्या जीवनपट उलगडताना अशी मोठी माणसे हीच समाजाची खरी श्रीमंती असतात, असे सांगितले. दादांनी एक पिढी तर घडवलीच, पण आमच्यासारख्या नव्यापिढीला आपल्या चारित्र्यातूनच प्रेरणा दिली. बहुजनांच्या गोरगरीब लेकरांना गावकुसात शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे आज अनेक तरूण-तरूणी जीवनात केवळ दादांमुळेच यशस्वी होऊ शकलेत, असे उद्गार शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी काढले.
१९६६ ते १९७५ हा काळ माझ्यासाठी अत्यंत खडतर होता. १९७२ मधे बीएच्या परीक्षेची फी भरण्यासाठी आईला आंधण म्हणून आलेला तांब्याचा हंडा माझ्या वडिलांनी विकून माझी परीक्षेची फी भरली, ही माझ्या जीवनातील सर्वात आठवणीची बाब असून, मला माझ्या जीवनात हीच बाब परोपकार करण्यासाठी प्रेरित करित राहते, असे भावोद्गार काढतांना शेणफडरावदादांचे डोळे पाणावले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अभीष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देतांना शेणफडराव घुबे यांनी जीवनात घडलेल्या घटनांना उजाळा दिला. १९६६ ते १९७५ हा काळ माझ्यासाठी अत्यंत खडतर होता. १९७२ मधे बीएच्या परीक्षेची फी भरण्यासाठी आईला आंधण म्हणून आलेला तांब्याचा हंडा माझ्या वडिलांनी विकून माझी परीक्षेची फी भरली, ही माझ्या जीवनातील सर्वात आठवणीची बाब असून, मला माझ्या जीवनात हीच बाब परोपकार करण्यासाठी प्रेरित करित राहते, असे भावोद्गार काढतांना शेणफडरावदादांचे डोळे पाणावले होते. भारत बोंद्रे यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाच्या पुण्याईने शाळा मिळाली. परंतु, शाळा चालविण्यासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध नव्हते, तेव्हा प्रसंगी पत्नीचे व भावजयींचे दागिने मोडून शाळेची उभारणी केली. हे सर्व करताना पाठीवरचे दोन लहान भाऊ व माझी दिवंगत पत्नी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. एवढेच नाही तर रामायणातील रामाला जेवढे बंधूप्रेम मिळाले त्यापेक्षा जास्तीचे प्रेम माझ्या भावांकडून मला मिळाले, हे सांगतांना शेणफडराव घुबे यांना कंठ दाटून आला होता. केवळ माझ्या भावांच्या ताकदीमुळेच आज मी समाजापुढे खंबीरपणे उभा असून, ‘राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे’ या संत वचनाचा हवाला देऊन आपल्या आध्यात्मिक वृत्तीचे दर्शन त्यांनी भाषणातून घडविले. आयोजकांनी माझ्या नांवापूर्वी ऋषितुल्य असे बिरूद लावून माझ्यावर जास्तीची जबाबदारी सोपवली ह्या बाबत स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले की, ‘प्रेम ही जोखीम आहे,’ ऋषितुल्य या शब्दाची बूज राखताना मला चाकोरीबद्ध व नैतिक अधिष्ठान या बाबतीत दक्ष राहून, जीवनाची वाटचाल करण्यासाठी बांधील राहून, प्रत्येक पाऊल पुढे टाकणे ही माझ्यासाठी कसोटी ठरेल. आज माझ्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहून आपण सर्वांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला, त्या प्रेमाची परतफेड करण्याची ऊर्जा मला आज मिळाली, हे माझे मी भाग्य समजतो, असे भावपूर्ण उद्गार काढून शेणफडराव घुबे यांनी उपस्थित मान्यवरांसह अन्य सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाची रिपरिप सुरु असतांना बुलढाणा शहरातील जेष्ठ नेत्यांसह परिसरातील जेष्ठ व श्रेष्ठ नेत्यांची उपस्थिती डोळ्यात भरणारी होती. त्यामधे हतेडी येथील बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती शेणफड पाटील जाधव, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते नामदेवराव जाधव, एकनाथ पाटील थुट्टे, जिल्हा परिषदेचे बाळाभाऊ भोंडे, एडव्होकेट बाबासाहेब भोंडे, प्रा. विष्णूपंत पाटील, अधीक्षक अभियंता कडाळे साहेब, वंजारी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष पंजाबराव ईलग, डॉ. राजेश्वर उबरहंडे, माऊली होमीओपॅथी क्लिनिकचे डॉ.दुर्गासिंह राजपूत, भगवानराव राजपूत, विलाससिंह राजपूत, डॉ.उमेश जाधव, अॅड. संदीप देशमुख, अॅड.सावळे, प्राचार्य कमलाकर पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके, अनिताताई टेकाळे, दुसरबीडवरुन आलेले कौसरभाई, खालेदभाई, सुनील घुगे, शिवानंद सांगळे, भीमराव शेळके, दीपक शेळके, मंगरूळ-इसरुळ येथून शेणफड पाटील सुरूशे, रामप्रसाद सुरूशे, समाधान पाटील गवते, गणेश पाटील शिंदे, सखा पाटील सुरूशे, प्रकाश पाटील भुतेकर, देऊळगाव घुबे येथून गजू पाटील घुबे, प्रकाश आबा, अंबादास बाबा, गजू काकडे, जगन्नाथ घुबे, गजानन घुबे, विलास मुजमुले, गजू सर, सुरेश पाटील, अशोक कोकाटे, केशव घुबे, पंजाब घुबे, उमेश घुबे, अशोक घुबे, शरद घुबे, कॉन्स्टेबल केशव घुबे, राहुल काकडे (मिसाळवाडी) यांच्यासह देऊळगाव घुबे परिसरातून आलेली व शेणफडराव घुबे यांच्यावर प्रेम करणारी मंडळी यांच्यासह असंख्य जणांची उपस्थिती ही शेणफडरावदादांची लोकप्रियता व दादांवर असलेल्या प्रेमाची ही पावतीच ठरली होती. या कार्यक्रमानंतर स्नेहभोजन पार पडले. आयोजकांनीही उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले.