– राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीला मात्र पद्धतशीरपणे दिला फाटा!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – एसटी कर्मचार्यांनी अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचार्याची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचार्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यात विशेष म्हणजे, कर्मचार्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळावे, राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणेच घरभाडे भत्ता मिळावा, या मागण्यांना मात्र मुख्यमंत्र्यांनी पद्धतशीरपणे फाटा दिला आहे. दरम्यान, या संपामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. संपाच्या दुसर्या दिवशी एसटीचा सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. तर राज्यभरातील २५१ पैकी ९४ एसटी आगार पूर्णपणे बंद होते. त्याचवेळी दिवसभरात सुमारे ७० टक्के वाहतूक बंद होती. विशेष म्हणजे, काल संपाच्या पहिल्या दिवशी अंदाजे १४ कोटींचे एसटीचे नुकसान झाले होते.
एसटी कर्मचार्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यासोबतच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील यादेखील बैठकीला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा असतानाच हा संप पुकारण्यात आल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती. राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली होती. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचार्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल झाले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना दि.१ एप्रिल २०२० पासून सरसकट मूळ वेतनात ६५०० रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना, भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, सगळ्या एसटी कर्मचार्यांच्या पगारात सरसकट ६५०० रुपयांची वाढ केलेली आहे. ज्यांच्या पगारामध्ये २०२१ पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना २०२१ मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात ४ हजारांची वाढ झाली आहे. मी महाराष्ट्रातील कर्मचार्यांच्यावतीने सरकारचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील सर्व कर्मचार्यांना विनंती आहे की, तुम्ही जो उस्फुर्तपणे संप पुकारला. त्या संपाला सरकारने यश दिलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे, अशी तुम्हाला विनंती आहे, असे आ. पडळकर म्हणालेत.
काय म्हणाले संघटनेचे पदाधिकारी….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आम्ही आभार मानतो. ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो, ते सढळ हस्ते पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं आहे. साडे सहा हजार रुपये पगारवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, गेल्या 6 महिन्यांपासून 2000 कर्मचारी घरी बसले आहेत. लहानसहान केसेससाठी घरी असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मला वाटतं हा आनंद जनतेसोबत कर्मचाऱ्यांनाही मोठा आहे. महाराष्ट्रात ही पहिली वेळ आहे, 23 संघटनांच्या कर्मचाऱ्यांची आज बैठक झाली. पुन्हा एकदा संघटनेतर्फे आम्ही राज्य सरकारचे आभार मानतो, असे संघटनेच्या पदाधिकारी यांनी म्हटलं आहे.