चिखली (महेंद्र हिवाळे) – छत्रपती शिवाजी महाराजांपासून केवळ मराठी माणसानेच प्रेरणा घेतली नाही तर, जगाने त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन आपली राष्ट्रे सशक्त व लढवय्ये बनवली. आयुष्यात मोठे ध्येय ठरवून ते कसे प्राप्त करायचे, याचा वस्तुपाठ शिवचरित्रातून शिकायला मिळतो, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांच्या प्रेरणेचा विषय आहेत, असे प्रतिपादन ‘बुलढाणा लाईव्ह’चे संपादक-संचालक तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे मानद सल्लागार, शिवव्याख्याते कृष्णा सपकाळ यांनी केले. तालुक्यातील देऊळगाव घुबे (ता.चिखली) येथे विघ्नहर्ता गणेश मंडळाच्यावतीने दि.१४ सप्टेंबररोजी आयोजित शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा सपकाळ म्हणाले, की अख्या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा हेवा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इस्त्राईलसारखे छोटेसे राष्ट्र चुहुबाजूंनी शत्रूराष्ट्र असतानादेखील ताठमानेने उभे आहे. व्हिएतनामसारखा छोटा देश अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला २७ वर्षे झुंजवत ठेवतो आणि अखेर अमेरिकेलादेखील गुडघे टेकायला भाग पाडतो, कारण व्हिएतनामच्या स्वातंत्र्याची देवता छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे तिथले राष्ट्राध्यक्ष सांगतात, असे कृष्णा सपकाळ यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील अनेक घटनांना सपकाळ यांनी आपल्या व्याख्यानात स्पर्श केला. शिवरायांना स्वतःला राजा व्हायचे होते म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केले नाही तर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःच्या सामर्थ्याचे विस्मरण झालेल्या आणि गुलामीच्या मानसिकतेत गेलेल्या समाजातूनच त्यांनी प्रचंड ताकदीचे वीर योद्धे उभे केले. समाजाची, राष्ट्राची उभारणी करीत असताना एका नेत्याची भूमिका कशी असली पाहिजे हे शिवचरित्रातून शिकायला मिळते, असेही कृष्णा सपकाळ म्हणालेत.
जीवनात संघर्षाची तयारी ठेवा- ठाणेदार विकास पाटील
यावेळी बोलतांना ठाणेदार विकास पाटील यांनी तरूणांनी आयुष्यात संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन केले. जीवनात एकदा अपयश आले म्हणजे खचून जायचे नसते, अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे सांगत असताना एका शेतकर्याचा मुलगा ते ठाणेदार असा प्रवास विकास पाटील यांनी सांगितला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
————-