गणेश उत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर बिबी येथे पोलिसांचा रूट मार्च!
बिबी (ऋषी दंदाले) – गणेश उत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर बिबी येथे बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने दि.१५ सप्टेंबर रोजी बिबी बसस्थानकापासून गावातील मुख्य रस्त्यावरून पोलीस कर्मचार्यांसह पथसंंचलन केले. आजच्या गणेश विसर्जनासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून, समाजकंटकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव बिबी गावात मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा झाला आहे. त्या अनुषंगाने आज, दि. १७ सप्टेंबररोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी निघणारी सार्वजनिक मंडळांची मिरवणूक या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देऊन संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने बिबी बसस्थानकापासून गावातील मिरवणूक मुख्य रस्त्यावरून मशीद समोरून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरून महत्त्वाच्या रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, महिला पोलीस, कर्मचारी, होमगार्ड यांचा समावेश होता. तसेच पथसंचलन झाल्यावर गणेश उत्सव व मिरवणूक ही शांततेत पार पडावी, याकरिता शांतता कमिटी व मंडळाचे अध्यक्ष, सदस्य यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या असून, गणपती उत्सव हा शांततेत तसेच गुण्यागोविंदाने पार पाडावा, व वेळेचे बंधन पाळून शांततेत गणेश विसर्जन करावे. याकरिता गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या.
——
गणपती उत्सव हा शांततेत गुण्यागोविंदाने पार पाडावा, याकरिता पोलीस प्रशासन सतर्क असून, खबरदारी घेत आहे. मिरवणुकीदरम्यान गुलालाचा, लेजर लाईटचा वापर टाळावा, तसेच डीजेवर बंदी असून, आवाजाचे काटेकोरपणे पालन करावे.
– ठाणेदार संदीप पाटील
———