मुख्यमंत्र्यांची ‘सुमडीत कोंबडी’!; समर्थक नेत्यांची महामंडळ, आयोगांवर वर्णी!
- संजय सिरसाठ यांना सिडकोचे अध्यक्षपद, तर आनंदराव अडसूळ यांना राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्षपद
– राज्यपाल पदाचे आश्वासन देऊन अडसुळांची आयोगाच्या अध्यक्षपदावर केली बोळवण
– शिंदे गटातील नेत्यांच्या नियुक्त्यांमुळे अजितदादा गट अस्वस्थ, उद्या बोलावली बैठक
मुंबई (खास प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच लागण्याची शक्यता असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक परंतु, असंतुष्ट नेत्यांची व आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी विविध महामंडळांवर बोळवण केली आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी (कॅबिनेट मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात आली असून, तत्पूर्वी, आमदार सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यासाचे प्रमुख ट्रस्टी, माजी खासदार हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राचे प्रमुख, तर आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. या महामंडळ वाटपात भाजप व अजित पवारांच्या एकाही नेत्याला संधी मिळालेली नसल्याने या दोन पक्षांत सद्या जोरदार धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुमडीत कोंबडी कापल्याची राजकीय चर्चा होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाने शासन आदेश जारी करत, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पदाचा शब्द दिला होता, असे स्वत: अडसूळ यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, अडसूळ यांना राज्यपाल पद न देता आयोगाचे अध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आलेली आहे. एकीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना महामंडळाचे वाटप होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला काहीच न आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यावर अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा योग्य सन्मान होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्यालादेखील महामंडळ येणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे समर्थकांना मिळालेल्या नियुक्त्या
१) प्रदूषण नियंत्रण बोर्ड अध्यक्ष – सिद्धेश कदम
२) सिद्धिविनायक न्यास प्रमुख – सदा सरवणकर
३) नीलम गोर्हे – कॅबिनेट पदाचा दर्जा
४) माजी खासदार हेमंत पाटील – हळद संशोधन केंद्र प्रमुखपदी वर्णी
५) माजी खासदार आनंदराव अडसूळ- अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती
६) आदिवासी भागात कुपोषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख डॉ. दीपक सावंत यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा
७) आमदार महेश शिंदे – उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
८) संजय शिरसाट – सिडको अध्यक्ष
दरम्यान, जागावाटपात धोका होण्याची शक्यता पाहाता, जागा वाटपासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार गटाची उद्या (दि.१८) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जागावाटप बरोबरच महामंडळ वाटपात बाबतदेखील निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता असताना पक्षातील असंतुष्ट नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळावर वर्णी लावून त्यांचे पुनर्वसन केले आहे. सिडकोसारख्या महत्वाच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी तर तिकीट नाकारण्यात आलेले आणि राज्यपाल होण्यास उत्सुक असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. तर धर्मपाल मेश्राम हे या आयोगाचे उपाध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे अजित पवार गटात सद्या कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
—————-