Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraVidharbha

ब्रेक दाबायचा तर अ‍ॅक्सिलेटर दाबले, कार उसळी घेत सरळ विहिरीत!

UPDATE : रात्री उशीरा अंत्यसंस्कार

देऊळगावराजाचे तहसीलदार श्याम धनमने, पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांनी नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. स्थानिक क्रेन व जेसीबी बोलविण्यात आल्या. कारचा शोध सुरु झाला, परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर काहीही यश येत नव्हते. काही वाचविणारेही यावेळी बोलविण्यात आले. यावेळी २२ वर्षीय युवक पवन तोताराम पिंपळे याने कोणालाही काही कळण्याच्या आत विहीरीत उडी मारली, पण तो थेट गाळात जावून फसला.. त्याला बाहेर काढण्यात आले. परंतु सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषीत करण्यात आले. तर ज्ञानेश्वर शिंगणे हा युवक दोरीच्या सहाय्याने खाली उतरत असतांना त्याला फिट आली, त्याला तात्काळ वर काढून रुग्णालयात भरती करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने ज्ञानेश्वरचे प्राण वाचले. अनेक तास उलटूनही विहीरीत कारचा शोध लागत नसल्याने, अन् सातत्याने पाण्याचा उपसा सुरु असल्याने.. शेवटी औरंगाबाद येथील विशेष आपातकालीन पथकाला तिथे पाचारण करण्यात आले. त्यांनी अवघ्या काही मिनीटातच कारसह मृतदेह बाहेर काढले, ते हृदयद्रावक दृश्य बघून घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. दरम्यान, सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन झाले असून, रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने जिल्हाभर शोककळा पसरली आहे.

Breaking News! विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या दाेघांपैकी एकजण गाळात रूतून ठार, एक अत्यवस्थ

विहिरीत गाळात रुतून मृत्युमुखी पडलेला तरुण.

विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी दोघेजण विहिरीत उतरले होते. परंतु, त्यापैकी एकजण गाळात रूतून मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आले आहे. पवन ताेताराम पिंपळे वय 30, रा. देऊळगावराजा असे या तरुणाचे नाव आहे. तर शिंगणे नावाचा अन्य एक 25 वर्षीय तरुण अत्यवस्थ आहे. गाडी शिकायच्या नादात हसतं खेळतं कुटुंब तर संपलेच, परंतु त्यांच्यासोबत आणखी एकालाही आपला जीव गमवावा लागला आहे. एकूणच या दुर्देवी घटनेत तिघांचा बळी गेला आहे. 


UPDATE : अशी घडली ही दुर्देवी घटना

चिखली रस्त्यावर सौ. स्वाती मुरकुट या कार चालवणे शिकत होत्या. मुलगी सिद्धी ही समोर तर पती शिक्षक अमोल मुरकुट हे मागे बसलेले होते. कार चालवित असताना समोर आलेल्या दुचाकीला वाचविण्यासाठी सौ. स्वाती यांनी ब्रेक दाबायचे तर अ‍ॅक्सिलेटर दाबले. त्यामुळे कारने एकच उसळी घेतली व सुसाट वेगात घराजवळ असलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण घटनेत क्षणातच होत्याचे नव्हते झाले. सौ. स्वाती आणि त्यांची ११ वर्षीय मुलगी यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तर अमोल मुरकुट हे कसेबसे खिडकीतून पाण्याबाहेर आले. ही हृदयद्रावक घटना दुपारी साडेबारा वाजता घडली. या घटनेनंतर नागरिक व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाणी व गाळ असल्याने रात्री उशीरा जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन तरुण मृतदेह बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरले. परंतु, ते गाळात फसले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा जालना येथे मृत्यूशी झुंज देत आहे. 


– देऊळगावराजा जवळील कुंभारी येथील हृदयद्रावक घटना

चिखली/देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – पत्नीला कार चालविणे शिकवताना, पत्नीने ब्रेक दाबायचा तर पायाने अ‍ॅक्सिलेटर दाबले. त्यामुळे गाडीने उसळी घेऊन वेगाने जात रस्त्याशेजारील ७० फूट खोलीच्या विहिरीत पडली. या दुर्देवी अपघातात पत्नीसह मुलगी कारसह विहिरीत बुडाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कुंभारीजवळ घडली. क्रेनच्या सहाय्याने सदर गाडी बाहेर काढण्यात रात्री उशिरा यश आले. या अपघातात शिक्षक पती कसेबसे बचावले आहेत. परंतु, पत्नी व मुलगी ठार झाली आहे. तसेच, मृतदेह बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या दाेघांपैकी एकाचा गाळात रूतून मृत्यू झाला असून, एकजण अत्यवस्थ आहे, त्याला जालना येथे भरती करण्यात आले हाेते. दरम्यान, अमोल मुरकुट सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळणी (बुद्रुक), ता. भोकरदन, जिल्हा जालना येथे कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबीयांबाबत घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे पत्नी स्वाती मुरकुट  यांना कार चालवणे शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट  हीदेखील बसलेली होती. दरम्यान, कार शिकवित चिखली रोडवर जात असताना, स्वाती यांनी ब्रेक दाबायचे तर अ‍ॅक्सिलेटर दाबले, त्यामुळे त्यांचा कारवरील ताबा सुटला. यानंतर कार वेगाने उसळी घेत सरळ रस्त्या शेजारील ७० फुट खोल विहिरीमध्ये कोसळली. या अपघातात अमोल मुरकुट हे खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. अमोल मुरकुट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, स्वाती मुरकुट व सिद्धी यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास रात्री उशिरा यश आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अमोल मुरकुट सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळणी (बुद्रुक), ता. भोकरदन, जिल्हा जालना येथे कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबीयांबाबत घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.


दरम्यान, घटनास्थळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिली असून, पोलिसांना सूचना केल्या आहेत. तसेच रुग्णालयात जावून शिक्षक अमोल मुरकुट यांची विचारपूसही केली. अपघातात मुरकुटे यांची पाचव्या वर्गात शिकणारी मुलगी सिद्धी मुरकुट आणि पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या घटनेने संपूर्ण देऊळगांवराजा परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखद आम्ही सहभागी आहोत, अशा भावना शिंगणे यांनी व्यक्त केल्यात.


मुलगा शाळेत गेल्याने बचावला

अमोल व स्वाती मुरकुट या दाम्पत्याला सिध्दी व स्वराज ही दोन अपत्य, सिध्दी ११ तर स्वराज ७ वर्षांचा. स्वराज हा सहकार विद्या मंदीरात पहिलीत शिकतो, आजच त्याची शाळा सुरु झाल्याने त्याला शाळेत पाठविल्यानंतर मुलीसह स्वाती व अमोल मुरकुट हे कार घेवून बाहेर पडले होते. मुलगा शाळेत गेल्याने तो बचावला असल्याच्या भावना होत्या. दरम्यान या घटनेची माहिती कळताच सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी त्यांनी प्रशासनाला काही सूचनाही दिल्या. रुग्णालयात जावून त्यांनी जखमींची विचारपूस केली. घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगून, शासकीय मदतीसाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन आ.शिंगणेंनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!