मेहकर (विशेष प्रतिनिधी) – पोलिस भरती, लष्करी दलात भरती करून नोकरी लावून देण्याच्या आमिषाने शेकडो युवकांची आर्थिक लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार मेहकरात उघडकीस आला असून, मेहकर येथे पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण अॅकॅडमीचे कार्यालय थाटून सुशिक्षित बेरोजगार युवकांना लुबाडणार्या भामट्यांविरोधात मेहकर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या भामट्याने तब्बल ४० युवकांना लाखो रूपयांनी लुटले असल्याचे दिसून येत आहे. त्याला मेहकर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस त्याच्याकडून कसून माहिती काढत आहेत.
मेहकर येथे राजीव गांधी कॉम्प्लेक्समध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या नावाखाली जिजामाता अॅकॅडमी थाटून पोलीस व भारतीय लष्करी दलात नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून प्रदीप एकनाथ खिल्लारे या युवकांने जिल्हासह आजूबाजूच्या जिल्हातील शेकडो युवकांकडून पैसे उकळून त्यांना लुबाडले असल्याचे दिसून आले असून, यापैकी फसवणूक झालेल्या ४० युवकांनी मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. मेहकर येथे २०१९ पासून राजीव गांधी कॉम्प्लेक्स मध्ये गाळे भाड्याने घेऊन मेहकर येथीलच प्रदीप एकनाथ खिल्लारे या युवकांने सदर अॅकॅडमी थाटली होती, आणि या अॅकॅडमीमध्ये येणार्या युवकांना नोकरीला लावून देतो असे आमिश दाखवत त्यांच्याकडून अगोदर ३० ते ५० हजार रुपये घेऊन, नंतर त्यांना पुणे, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी घेऊन जावून ज्वॉइनिंग लेटर देतो, असे सांगून ना त्या कारणाने याला द्यायचे, त्याला द्यायचे, असे सांगत कोणाकडून २ लाख तर कोणाकडून ५ ते ७ लाख रूपये असे शेकडो युवकांकडून लुटले आहेत. नोकरीचे आमिश दाखवलेल्या युवकांना समृद्धी महामार्गा जवळील परिसरात प्रशिक्षण देवून नंतर त्यांना कोल्हापूर, सातारासारख्या शहरात इतर मोठ्या अॅकॅडमीमध्ये नेऊन तेथून तुम्हाला ज्वॉइनिंग लेटर देतो म्हणून, तो सांगायचा. मात्र नंतर आज हे साहेब नाहीत, नंतर ज्वॉइनिंग लेटर घेवू असे सांगत, नेहमी लुबाडणूक करत होता.
अशातच पैसे देणार्या युवकांनी नोकरीचा तगादा लावल्यानंतर तो गायब झाला. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही, तेव्हा आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले व त्यांनी मेहकर पोलिसांत धाव घेतली. तब्बल ४० युवकांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी काल, दि.४ सप्टेंबररोजी प्रदीप एकनाथ खिल्लारे याच्यासह इतरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मोठ्या शिताफीने आरोपीला पकडल्यानंतर न्यायालयाने त्याची पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या फसवणुकीत शेकडो युवकांची कोट्यवधी रूपयांनी लूट झाल्याचा संशय आहे.