शेतमालाला भाव, आणि विकास हवा असेल तर ऋतुजाताईंना विधानसभेत पाठवा!
- युवा नेते सुजात आंबेडकर यांचे मेहकर-लोणारवासीयांना आवाहन
– डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांनी गाजवली डोणगाव येथील सभा!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्यांच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही. देशाच्या पंतप्रधानांनी शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले, पण सोयाबीनचे भाव तर निम्म्यावर आलेत. शेतमालाला भाव आणि या मतदारसंघात विकास हवा असेल, तर अभ्यासू, सुशिक्षीत नेतृत्व डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांना मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत पाठवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांनी केले. डोणगाव येथील सभा त्यांनी चांगलीच गाजवली. या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी व शेतकरी चळवळीच्या उमेदवार डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर हे डोणगाव येथे आले होते. यावेळी त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांना व्यापक जनसमर्थन लाभले असून, यंदा या मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे मानले जात आहे. गाव, शहर ते संपूर्ण मतदारसंघ पालथा घालत ऋतुजाताईंनी जनसामान्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या प्रत्येक प्रचार सभेला, दौर्याला जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. ठीकठिकाणी त्यांच स्वागतही होतं आहे.
आज, दि.१६ नोव्हेंबररोजी ऋतुजाताईंच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांची तुफान सभा पार पडली. अलोट गर्दीने जनसामान्यांनी सुजात आंबेडकर यांना प्रतिसाद दिला. सुजात आंबेडकर यांनी डोणगाव येथील वादळी सभेत ‘सोयाबीन, कपाशीचे गडगडलेले भाव व डोणगाव शहराची भकास झालेली अवस्था जर बदलायची असेल, तसेच परंपरागत पक्षांना मात द्यायची असेल, तर अभ्यासू, उच्चशिक्षित, तळमळीचे उमेदवार विधानसभेत पाठवायला हवे, त्यामुळे ऋतुजाताई चव्हाण या सर्वोतपरी सक्षम पर्याय आहे. परिवर्तनासाठी, विकासासाठी ऋतुजाताईंना निवडणूक द्या, असे आवाहनही सुजात आंबेडकर यांनी केले. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने स्त्री, पुरूष व युवावर्ग उपस्थित होता.