BULDHANAHead linesVidharbha

गुलाबराव खरात बुलढाणा ‘झेडपी’चे नवे ‘सीईओ’

बुलढाणा (बाळू वानखेडे) – येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) आता गुलाबराव राजाराम खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एका वर्षात जिल्हा परिषदेला तब्बल तीन सीईओ मिळाले असून, या महत्त्वपूर्ण पदाचा एक प्रकारे खेळ होत असल्याचे बोलले आहे. या निमित्ताने सत्ताधार्‍याकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांची बदली झाल्यानंतर येथे विशाल नरवाडे हे जिल्ह्यातीलच तरूण आयएएस अधिकारी या पदावर रूजू झाले. त्यांनी कामाचा धडाकादेखील लावला होता. अशातच ते जिल्ह्यातील रहिवासी असून, लोकसभा निवडणुकीची वेळ पाहता त्यांना जिल्ह्यात ठेवू नये, अशा प्रकारचा सूर उमटला होता. शिवाय, तशी तक्रारदेखील काही संघटनांनी केली होती. त्यामुळे दोन महिन्यात त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर शुभम गुप्ता हे अधिकारी येथे नियुक्त करण्यात आले होते. परंतु ते रूजू झालेच नाही. गेल्या तीन महिन्यापूर्वी कुलदीप जंगम हे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आले होते. परंतु आगामी विधानसभा निवडणुका पाहता, त्यांचीदेखील बदली करण्यात आली आहे.
यादरम्यान प्रभारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी चांगले काम पाहिले. आज, दि. ५ सप्टेबररोजी मुंबई येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक गुलाबराव खरात यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सीईओपदी शासनाने नियुक्ती केली आहे. ते २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, एक शिस्तीचा अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख आहे. आता तेसुद्धा रूजू होतात की नाही, झाले तर किती दिवस राहतात, याबाबत जिल्हा परिषद वर्तुळातून चर्चा ऐकायला येत आहे. एका वर्षात झेडपीला तीन सीईओ मिळाले असून, एवढ्या महत्त्वाच्या पदाचा खेळ मांडल्याच्या भावना जिल्ह्यात उमटत आहेत, तर सत्ताधारी, मंत्री, आमदार नेमके करतात तरी काय, असेही सुजाण नागरिक आता बोलू लागले आहेत.


मूळचे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा येथील असलेले गुलाबराव खरात हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) १९९६ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून शासन सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर २०११ मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांना बढती मिळाली होती. गेल्या २५ वर्षांपासून ते महसूल विभागात कार्यरत आहेत. अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. पदोन्नतीनंतर त्यांनी सुरवातीला नंदुरबार नंतर जळगावला अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. काही काळ ते पुणे येथे शेती महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, जळगाव आणि धुळे आदी ठिकाणी जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहण्याची संधी त्यांना मिळाली होती. २०२३ मध्ये राज्य सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी त्यांचा महाराष्ट्र राज्य नागरी सेवा केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) केडरमध्ये समावेश केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!