BULDHANAHead linesMaharashtra

जाळीचा देवसह महानुभव पंथांच्या ८ देवस्थानांसाठी २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना राज्य सरकारची मंजुरी

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील शिखर समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) – श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यांच्या यशस्वी अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र, देवस्थान विकास शिखर समितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, यंदाचे वर्ष हे श्री चक्रधर स्वामींचे अष्टशताब्दी जन्मोत्सव वर्ष आहे. तसेच आज त्यांची जयंती आहे, यानिमित्ताने महानुभाव पंथाच्या देवस्थानांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भक्तीधाम प्रल्हादपूर येथील श्री संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, यासाठी दोन टप्प्यात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच संत सावता माळी यांचे गाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अरण या गावाला अ वर्ग तीर्थक्षेत्र जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत ग्रामविकास विभागाच्या अमरावती जिल्ह्यातील श्री संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी, रिद्धपूर तीर्थक्षेत्रासाठी १४.९९ कोटी, बीड जिल्ह्यातील श्री पांचाळेश्वर तीर्थक्षेत्रासाठी ७ कोटी ९० लाख, श्री क्षेत्र पोहीचा देव तीर्थक्षेत्रासाठी ४ कोटी ५४ लाख, जालना-बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जाळीचादेव तीर्थक्षेत्रासाठी २३ कोटी ९९ लाख, वर्धा जिल्ह्यातील श्री गोविंद प्रभू देवस्थानासाठी १८ कोटी ९७ हजाराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच पर्यटन विभागाच्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या विकासासाठी १६४.६२ कोटींच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील शिवपार्वती तलावाच्या सुशोभीकरणासाठी १४ कोटी ९७ लाखाच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!