लाडक्या बहिणींना दीड नाही; महिन्याला दोन हजार रूपये देणार!
सांगली (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर आम्ही दीड हजार नाही, महिन्याला दोन हजार रूपये लाडक्या बहिणींना देऊ, असे स्पष्ट आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगली येथील जाहीर सभेत महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींना दिले. त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात सर्व महिलांनी जोरदार स्वागत केले. हे सरकार निवडणुकीच्या तोंडावर दीड हजार रूपये देत आहे, नंतर ते ही योजना बंद करतील. पण, आम्ही सत्तेवर आलो तर तुम्हाला दोन हजार रूपये महिन्याला देऊ, असेही खरगे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेस नेते तथा देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी खरगे हे बोलत होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे १ लाख ७० हजार मतांनी जिंकले आहेत. मात्र, विश्वजित कदम हे एका विधानसभेत १ लाख ४० हजार मतांनी जिंकले, असे सांगत खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोलादेखील लगावला. खरगे पुढे म्हणाले की, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीही आमच्यासोबत आहे. त्यांच्या बाजूने जे आहेत, ते सर्व नकली आहेत. मोदी सरकार केवळ तोडण्याच्या अन् फोडण्याच्याच गोष्टी करते. त्या पलीकडे जाऊन त्यांनी काही केले आहे का? मोदींसमोर तुम्ही तुमचा सन्मान गहाण ठेवणार आहात का? महाराष्ट्र जर जिंकला तर संपूर्ण देश जिंकेल, आणि लवकरच भाजपचे सरकार जाणार असा हल्लाबोलही त्यांनी केला.
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तर पुतळा पडला. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली तर मंदिर गळायला लागले. गुजरातच्या पुलाचे उद्घाटन केले तर तो पुलही कोसळला. मोदी येत आहेत म्हणून पुतळा लवकरात लवकर बनवण्यात आला आणि घाईघाईत केलेल्या या कामामुळेच हा पुतळा कोसळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले जे काही बनवत आहे, ते सर्वकाही कोसळतंय. शाळेतील अभ्यासक्रमही ते बदलत आहेत. संविधान बदलण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र आम्हाला जर आणखी २० जागा मिळाल्या असत्या तर तुम्हाला आज मोदी सरकार दिसले नसते, असा दावाही खरगे यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हा काही केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही तर तो संपूर्ण देशाचा अपमान आहे. हा अपमान राज्यातील भाजप सरकारने केला आहे. पुतळा पडल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन माफी मागितली. त्यांनी ही माफी का मागितली माहिती आहे – कोणतीही गुणवत्ता नसताना आरएसएसच्या माणसाला मूर्ती बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणून, मूर्ती बनविण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूष महान व्यक्तींचा त्यांनी अपमान केला म्हणून.. मोदींनी ही माफी मागितली असावी, अशी खोचक टीका याप्रसंगी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रसंगी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.