शेतकर्यांत संभ्रम निर्माण करू नका; पीकविमा कंपनीविरोधात काय कारवाई केली ते सांगा?
– अन्नत्याग आंदोलनाच्या दुसर्या दिवशीच आंदोलन पेटले; राज्यात ठीकठिकाणी तीव्र आंदोलने!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – आमचे आंदोलन सुरू झाल्यावर काही सत्ताधारी नेत्यांना आता जाग आली आहे. पीकविम्यासाठी आंदोलनाची भाषा ते करीत आहेत. परंतु यापूर्वी त्यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेऊन पीकविमा खात्यात जमा होण्याच्या तारखांवर-तारखा दिल्या आहेत. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. पण आता शेतकर्यांचे आंदोलन सुरू झाल्याचे पाहून त्यांना जाग आली असून, शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. शेतकर्यांची फसवणूक करणार्या कंपनीविरोधात सत्ताधार्यांनी नेत्यांनी काय कारवाई केली, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधारी नेत्यांना फटकारले आहे. दुसरीकडे, अन्नत्याग आंदोलनाच्या दुसर्याच दिवशी तुपकरांचे आंदोलन चांगलेच पेटले. बुलढाणा येथे शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यानंतर तुपकारांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई तुपकरांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तर सिंदखेडराजा येथे शेतकर्यांनी अर्धनग्न रॅली व कापसाची झाडे हातात घेवून रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
सोयाबीन – कापूस दरवाढ प्रश्न, पीकविमा, अतिवृष्टीची १०० टक्के नुकसान भरपाई, कर्जमुक्ती यासह शेतकर्यांच्या न्यायहक्काच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. तुपकरांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या आंदोलनाचा सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आता काही सत्ताधारी पीकविम्याचे श्रेय घेण्यासाठी समोर येताना दिसून येत आहेत. ज्यांना पीकविम्याचे श्रेय घ्यायचे आहे, त्यांनी खुशाल श्रेय घ्यावे, परंतु त्याआधी आमच्या शेतकर्यांच्या खात्यात पीकविमा जमा करावा, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. आम्ही जेव्हा मंत्रालयाचा ताबा घेण्याचे आंदोलन केले, तेव्हा फेब्रुवारीपर्यंत शेतकर्यांना पीकविमाचे पैसे मिळतील, असे आश्वासन देण्यात आले होते. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापर्यंत हे पैसे शेतकर्यांच्या खात्यात जमा होणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेऊन वारंवार तारखा जाहीर केला. तश्या बातम्यादेखील वृत्तपत्रांमधून छापून घेतल्या. तारखांवर-तारखा देऊनही काहीच फायदा झाला नाही, आता सप्टेंबर उजाडला तरी शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. आम्ही अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केल्यावर कंपनीने खरीपचे काही पैसे दिले, परंतु अजूनही असंख्य शेतकर्यांचे पैसे बाकी आहेत. तर रब्बीच्या पीकविम्याचे संपूर्ण पैसे अद्याप बाकी आहे. आमचे आंदोलन सुरू झाल्याने आता काही सत्ताधारी नेते पीकविमाचे श्रेय घेण्यासाठी आंदोलनाची भाषा करत आहेत, सत्ताधारी लोकप्रतिनिधींना आंदोलनाची भाषा शोभते का? पीकविमा कंपनीने विहित मुदतीत शेतकर्यांना पैसे देण्यास विलंब केल्यामुळे दंड म्हणून १२ टक्के व्याज शेतकर्यांना देण्याचा नियम आहे. पण त्याबाबत सरकार बोलायला तयार नाही. सदर पीकविमा कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकले नाही..? या पीकविमा कंपनीवर गुन्हे का दाखल केले नाही? असे प्रश्न तुपकरांनी उपस्थित केले असून, सरकार पीकविमा कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप तुपकरांनी केला. सोयाबीन – कापसाच्या दरवाढी संदर्भात लोकप्रतिनिधी का बोलत नाही, आमचे आंदोलन सुरू झाल्यामुळे पीकविम्यासाठी धडपड करणारे नेते सोयाबीन – कापसाच्या भाववाढीसाठी दिल्लीत जाऊन का बसत नाही..? हिम्मत असेल तर त्यांनी सोयाबीन-कापूस भाव वाढीसाठी दिल्लीत ठाण मांडावे, असे आवाहनदेखील रविकांत तुपकर यांनी केले आहे. वेळेवर शेतकर्यांना पीकविमा दिला असता आणि सोयाबीन – कापसाला जर योग्य भाव दिला असता, तर आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असेदेखील रविकांत तुपकरांनी म्हटले आहे. आता उगाच शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा आणि शेतकर्यांना संभ्रमीत करण्याचा प्रयत्न काही सत्ताधारी नेत्यांनी करू नये. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आम्ही हाती घेतले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.
—
तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात ठीकठिकाणी आंदोलने
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाचे समर्थन करण्यासह आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी गावागावातील शेतकरी आता बाहेर पडत आहेत. बुलढाणा तालुक्यातील शेतकर्यांनी एकत्रित येवून आज अॅड.शर्वरी तुपकरांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यासमोर जोरदार निदर्शने केली. सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची दख्ाल घ्या, अशी मागणी शेतकर्यांनी केली. या आंदोलनानंतर अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्यासह शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तर बुलढणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, मोताळा,खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जमोद येथील तहसीलदारांनाही शेतकर्यांना निवेदने दिली आहेत. शेतकर्यांच्या संयमाचा अंत पाहू नका,अन्यथा राज्यभर आंदोलन पेटेल असा, इशारा शेतकर्यांनी यावेळी दिला आहे. तर सिंदखेडराजात शेतकर्यांनी अर्धनग्न होवून हातात कपाशीची झाडे घेवून निषेध रॅली काढली. यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत जोरदार घोषणाबाजी करत शेतकर्यांनी सरकारचा निषेध केला. आता टप्प्याटप्प्याने हे आंदोलनाचा अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. बुलढाण्याप्रमाणेच वाशिम, वर्धा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर या जिल्हयामध्ये शेतकर्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदने देवून रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर हिंगोली व वाशिममध्ये शेतकर्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले तर अनेक ठिकाणी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तर उद्या गावागावात शेतकरी प्रभातफेरी काढून या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
——
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख व गायत्री शिंगणे यांचे आंदोलनस्थळी भेट देवून दिला पाठिंबा
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. दरम्यान, या आंदोलनाला विविध संघटना तसेच पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली व या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. तसेच गायत्री शिंगणे यांनीदेखील आंदोलनस्थळी पोहोचून या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.