काकडेंसारख्या माणसाला विधानसभेत पाठवा; सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचे आवाहन!
शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – काही राजकारणी असे आहेत, की आज सकाळी एका पक्षात, तर संध्याकाळी दुसर्या पक्षात जातो. त्यामुळे अशा राजकारणावर भाष्य करणार नाही, पण मताची टक्केवारी वाढवून काकडेसारखा सामान्य माणूस विधानसभा निवडणुकीत निवडून आणावा लागेल, असे प्रतिपादन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेवगाव येथे ‘वज्ननिर्धार’ मेळाव्यात बोलताना केले. शेवगाव येथे ‘जनशक्ती’चे नेते शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांच्यावतीने ‘जिंकुनी आणिले पाणी’ या फिल्मचे अनावरण व पाणी प्रश्नासाठी लढवय्या शेतकर्यांचा गुण गौरव समारंभ तसेच ‘पाऊले सामर्थ्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिनेअभिनेते अनासपुरे बोलत होते.
मकरंद अनासपुरे म्हणाले, की आज राजकारणावर कोणाचा भरवसा राहिला नाही. जनतेनी डोळे उघडून नीट पहावे लागेल, जनताही आज राजकारण्यांना जाब विचारायला लागली आहे. टक्केवारी जनतेला कळू लागली असल्याचे सांगून मताची टक्केवारी वाढवून काकडेंसारखा अभ्यासू व सामन्याची नाळ समजणारा हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा. काळ भयंकर असून, कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. पण शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे हे सामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न करतात, त्यांना खंबीरपणे साथ द्यावी, असे आवाहन अनासपुरे यांनी केले. तर यावेळी अॅड शिवाजीराव काकडे म्हणाले, की तीन साखरसम्राटांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे. त्यांनी ३०-४० वर्षांत काय विकासाचे दिवे लावलेत. पिण्याचे व शेतीचा पाणी प्रश्न कायम प्रलंबित ठेवला आहे, असा आरोप करून त्यांना आता हिसका दाखवावा लागेल, असे सांगून घुले, राजळे, ढाकणे यांचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. घराणेशाही बाजूला हटविण्याची, भविष्यात सामान्य जनताविरुद्ध साखरसम्राट बडे नेते अशी लढाई होऊन एक क्रांती घडणार आहे. ताजनापूरचे हक्काचे पाणी व शेवगावला एमआयडीसी सुरू होण्यासाठी विधानभवनात हक्काचा माणूस पाठवावा लागेल. त्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे लागणार असल्याचे अॅड. काकडे यांनी सांगितले. यावेळी हर्षदा काकडे म्हणाल्या, की विद्यमान लोकप्रतिनिधी व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी काय विकासाचे दिवे लावलेत, असा सवाल करून टक्केवारीमुळे विकासकामांचा संपूर्ण बोजवारा उडाला गेला आहे. अनेक महत्वाची कामे हाणून पाडली गेली आहेत. आता ताजनापूरसाठी निवडणूक करावी लागणार आहे, त्यासाठी साथ द्यावी. आज शेवगाव-पाथर्डी शहरात १५ -१५ दिवस पाणी मिळत नाही. तसेच नातेगोत्याचे व जातीपातीचे राजकारण करून शहरात दंगल घडवून आणल्याचा आरोप सौ.काकडे यांनी केला. सध्या परिवर्तन फक्तं कुटुंबाचे सुरू आहे. ते परिवर्तन बदलायचे असून, साखरसम्राटांना पालथे करण्याची हिच वेळ आहे. आता माघार नाही, लढाईसाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी भाऊसाहेब सातपुते यांनी प्रास्ताविक केले तर नारायण गर्जे, बबनराव माने, भाऊसाहेब मडके यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावंडे, विनोद मोहिते, पवनकुमार साळवे, अशोक ढाकणे, हभप मारुती झिरपे, ज्ञानेश्वर बटूळे, संतोष गायकवाड, गोरख कर्डिले, विनायक देशमुख, अल्ताफ शेख, भाऊसाहेब बोडके, बाळासाहेब कचरे, वैभव पूरनाळे, भागवत भोसले, लक्ष्मण गवळी, माणिक गर्जे, रामजी साळवे, विनायक काटे, नारायण टेकाळे, संजय काकडे, देविदास गिर्हे ,संतोष राठोड, भगवान डावरे, भगवत भोसले यांच्यासह महिला, ग्रामस्थ कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगन्नाथ गावडे यांनी आभार मानले.