Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraVidharbha

पीकविमा कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; मगच माझ्याकडे या!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १०० टक्के नुकसान भरपाई, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी तुपकर अन्नत्याग करीत आहेत. हे आता आंदोलन व्यापक होण्याची चिन्हे दिसत आहेत. तुपकर यांची हटके आंदोलनाची स्टाईल पाहता, तुपकर आता पुढे नेमका काय पवित्रा घेणार याकडे शेतकर्‍यांसह प्रशासनाचे, पोलीस यंत्रणांचेदेखील लक्ष लागून आहे. तुपकर यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी राज्य सरकारच्यावतीने मध्यस्थी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वात प्रशासनाचे शिष्टमंडळ तुपकरांना भेटले. यावेळी तुम्ही पीकविमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करत नाही, असा सवाल तुपकरांनी केला. आधी गुन्हा दाखल करा, मगच माझ्याकडे या, असेही तुपकरांनी ठणकावले.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काल सायंकाळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार, पीकविमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी हे रविकांत तुपकर यांना भेटायला आंदोलनस्थळी आले. आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती अधिकार्‍यांनी तुपकरांना केली. मात्र शेतकर्‍यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होवून अंमलबजावणी सुरू होत नाही, तोपर्यंत अन्नाचा कणदेखील घेणार नाही, असे तुपकर यांनी अधिकार्‍यांना ठणकावले. यावेळी तुपकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने अधिकारीही निरूत्तर झाले. पीकविम्याच्या प्रश्नांवर तुपकरांनी अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले. सरकारने पीकविमा कंपनीला रक्कम दिली आहे. मात्र तरीही पीकविमा कंपनी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पीकविमा कंपनीच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा का दाखल करीत नाही..? असा सवाल तुपकरांनी केला. या प्रश्नांचे उत्तर अधिकार्‍यांकडे नव्हते…त्यामुळे सर्व अधिकारी निरूत्तर झाल्याचे दिसून आले. मेलो तरी शेतकर्‍यांना पीकविमा व नुकसान भरपाई देऊनच मरेल, असा टोकाचा निर्धार शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी व्यक्त केल्याने राज्य सरकारची चांगलीच गोची झाली आहे.


आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकर्‍यांचे लक्ष!

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची आज मुंबईत बैठक होत आहे. यात शेतकरीप्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता असून, शेतकर्‍यांना पीकविमा रक्कमदेखील तातडीने दिली जाणार आहे. परंतु, याचे श्रेय रविकांत तुपकरांना भेटणार नाही, याची काळजी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार हे घेत असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. रविकांत तुपकर यांना विधानसभा निवडणूक लढायची असून, ते सिंदखेडराजा मतदारसंघातून उभे राहू शकतात. त्यामुळेच त्यांनी अन्नत्याग आंदोलनासाठी सिंदखेडराजाची निवड केली आहे. ते भूमिका शेतकरीहिताची मांडत असले तरी त्याआडून सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघात आपला खुटा हलवून बळकट करत आहेत. तुपकरांचा हा सुप्त हेतू सफल होणार नाही, यासाठी शेतकरीहिताच्या मागण्या या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मान्य करण्याचे नियोजनही सरकार पातळीवर चालू असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. त्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज भल्यापहाटे जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचेही कळते आहे. त्यामुळे शेतकरीप्रश्नी राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे आता शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.

मराठा आरक्षण, शेतकरीप्रश्नी मनोज जरांगे पाटलांशी राज्य सरकारची भल्यापहाटे चर्चा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!