Marathwada

सारोळा येथे ‘आनंदाचा शिधा’ रेशन लाभार्थ्यांना शाही सोहळ्यात वाटप

उस्मानाबाद (विठ्ठल चिकुंद्रे) – शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, सर्वसामान्य गोरगरिबांची दिवाळी यंदा अभूतपूर्व मदतीने गोड केल्याचा सर्वोच्च आनंद झाल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. उस्मानाबाद- धाराशिव तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे दीपावली पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तावर आमदार राणादादा पाटील यांच्याहस्ते आनंदाचा शिधा किटचे वितरण मोठ्या शाही सोहळ्यामध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सारोळा येथील श्री रामप्रभू व श्री हनुमान मंदिरामध्ये मंगळवारी (दि. २६) हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन पीक विम्याची लढाई जिंकत शेतकर्‍यांना साडेपाचशे कोटीपेक्षा अधिक पिकविमा मंजूर करून तब्बल २०१ कोटी रुपये प्राप्त केल्याबद्दल आमदार राणादादा पाटील यांचा सारोळा ग्रामस्थांच्या वतीने भव्य -दिव्य , जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, मागील अडीच वर्ष शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची पिळवणूक झाली. आघाडी सरकारने सर्व घटकांना वार्‍यावर सोडले. शेतकरी, शेतमजुरांना दमडीची ही मदत दिली नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातला एकही महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावला नाही. परंतु राज्यात अवघ्या तीन महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा- सेना महायुतीच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापूर येथील प्रसाद योजनेतून विविध विकास कामे हिमतीने मार्गी लावली आहेत. तसेच शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे ९२ कोटी, सततच्या पावसाचे १०२ कोटी तर २०२० च्या पीक विम्याची न्यायालयीन लढा देऊन साडेपाचशे कोटी आपण मंजूर करून घेतले आहेत. पैकी २०१ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यश आले आहे. दोन दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. प्रोत्साहनपर अनुदानातून शेतकर्‍यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये सरकारकडून दिले जात आहेत. जिल्ह्यातील तब्बल ७१ हजारपेक्षा अधिक शेतकरी बंधू -भगिनींना याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे यावर्षी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, सर्वसामान्य, गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आल्याने यंदा सर्वांचीच दिवाळी अभूतपूर्व उत्साह, आनंदी व गोड झाली आहे. पीक विम्याचे उर्वरित साडेतीनशे कोटी तसेच अतिवृष्टीचे साडेचारशे कोटी अन्य मदत असे साधारणत: पंधराशे कोटी रूपयेपेक्षा अधिक नुकसान भरपाई रक्कम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे. अडीच वर्षातील अपयश झाकण्यासाठी विरोधक नौटंकी व स्टंटबाजी करीत आहेत, त्यांचा जनता जनार्दन लवकरच बुरखा फाडेल असा इशाराही आ. पाटील यांनी दिला.

या सोहळ्यास पत्रकार धनंजय रणदिवे, लोकनियुक्त सरपंच प्रशांत रणदिवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश भाऊ देवगीरे, रमेश आप्पा रणदिवे, जीवन भाऊ पाटील, सोसायटीचे चेअरमन श्रीकृष्ण उर्फ भाऊसाहेब रणदिवे, व्हाईस चेअरमन अ‍ॅड.महावीर देवगिरे, संचालक अरुण मसे, गौतम बप्पा रणदिवे, संचालक अमर बाकले, ज्योतीराम रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य नितीन दादा पाटील, सुधाकर देवगिरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक सुजीत बाकले, पांडुरंग कठारे गुरूजी, भालचंद्र कठारे, रावसाहेब मसे, पांडुरंग कुदळे, भागवत जटाळे पंडित खरे, खंडू शिंदे, सुरेश शिंदे तसेच शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचवेळी राणा दादांचा हृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बाजीराव जाधवर सर तर आभार सरपंच श्री रणदिवे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!