महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्यासाठीच राज्यात सत्तांतर!
– तीन प्रकल्प गुजरातला पळविले, शिंदे सरकार चकार शब्दानेही केंद्र सरकारला बोलले नाही!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – ‘राज्यात तीन महिन्यांपूर्वीच सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. या तीन महिन्यांमध्येच महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले. हे तिन्ही प्रकल्प एकाच राज्यात गेले, हा योगायोग म्हणायचा का? यावरुन एक शंका येते की, महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात आले का?’ असा सवाल राज्याचे माजी उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. महत्त्वाचे म्हणजे, हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर या प्रकरणावर राज्य सरकार केंद्र सरकारविरोधात शब्दसुद्धा बोलत नाही. महाविकास आघाडी सरकारला दोष देण्यापलीकडे या सरकारने कोणतेही काम केले नाही, अशी टीकाही देसाई यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.
टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठली आहे. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. देसाई म्हणाले की, ‘मी हे वक्तव्य विचारपूर्वक करत आहे. महाराष्ट्रातील तिन्ही प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे एखादे तरी शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे गेले का? केंद्र सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांनी केला का? असे असंख्य सवाल यावेळी देसाई यांनी उपस्थित केले.
टाटा-एअरबसचा नागपूरच्या मिहान येथील प्रस्तावित प्रकल्प महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता तर राज्यात तब्बल २२ हजार कोटीची आर्थिक गुंतवणूक झाली असती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणार्या तरुणवर्गाला मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता. त्यामुळे टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला जाणे, ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारसाठी मोठी नामुष्की ठरली आहे.
—————-