चिखली (विशेष प्रतिनिधी) – शेतात हरभरा पेरण्यासाठी बैलगाडीतून बियाणे, खतांच्या गोण्या घेऊन जात असताना, तोल जावून बैलगाडीवरून पडून, बैल व चाकांचा डोक्याला मोठा मार लागल्याने भरोसा येथील गौतम सुदाम जाधव (वय ३८) या तरुण शेतकर्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या शेतकर्याच्या मृत्यूमुळे गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत होती. राज्य सरकारने या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे आली आहे.
भरोसा गावातील गौतम सुदाम जाधव हे आज सकाळी साडेनऊ वाजता बैलगाडीतून घसरून पडले व त्यांना गाडीची चाके व बैलाचा मार लागल्यामुळे मोठी दुखापत झाली होती. त्यांना प्रथम चिखली येथील जवंजाळ डॉक्टर यांच्याकडे नेण्यात आले होते. परंतु डॉक्टर जवंजाळ यांनी सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. सदर पेशंट सरकारी दवाखान्यात नेला असता, सरकारी दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी गौतम सुदाम जाधव यांना मृत घोषित केले. गौतम जाधव हे शेतामध्ये हरभरा पेरण्यासाठी खताच्या थैल्या, बी घेऊन जात असताना, त्यांचा गाडीबैलातून तोल जाऊन खाली पडल्याने त्यांना मार लागला होता. गावातील विशाल जाधव, अमोल जाधव, आशा जाधव, केशव थुटे, अंकुश थुटे, विष्णू थुटे, हरिदास जाधव हे त्यांच्यासोबत दवाखान्यात हजर होते. गौतम जाधव यांचा मृत्यू झाल्यामुळे भरोसा गावावर तसेच जाधव कुटुंब व नातेवाईकांवर मोठी शोककळा पसरली आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.