ChikhaliHead linesVidharbha

चिखली येथे उभारणार छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा

– मौनी महाराज मठात पार पडली सर्वपक्षीय चिखलीकरांची महत्वपूर्ण बैठक

चिखली (एकनाथ माळेकर) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा चिखली शहरात व्हावा, अशी चिखलीकरांची इच्छा आता पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली असून, या संदर्भात शहरातील मौनी महाराज मठात सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत हा पुतळा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, सर्वपक्षीय पुतळा समितीच्या अध्यक्षपदी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चिखली शहरात असावा, अशी बर्‍याच दिवसांपासून शिवप्रेमींची मागणी सुरू होती. चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींचा पुतळा हा उभा पुतळा असून, त्या पुतळ्याऐवजी त्याच ठिकाणी भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चिखली शहरातील सर्वपक्षीय नागरिकांची बैठक होऊन चिखली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, असा एक मुखाने ठराव घेण्यात आला आणि त्यास सर्वांनी मान्यता दिली. शहरातील सर्व पक्षीय नागरिकांची मौनी महाराज मठ याठिकाणी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. अश्वारुढ पुतळा बसविण्यासाठी पुतळा समिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी समिती गठीत करण्याचेसुद्धा यावेळी ठरले. या समितीच्या अध्यक्षपदी चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणार्‍या शिवप्रेमींची मागणी लक्षात घेता, चिखली शहरांमध्ये उभारण्यात येणारा शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळ्यासाठी आमदार सौ. श्वेताताई महाले यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झालेली आहे. परंतु समितीमधील उर्वरित सदस्यांची नियुक्ती अजूनपर्यंत झालेली नाही. यासाठी ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी झोकून देवून काम करायचे आहे, अशा व्यक्तींची या समितीमध्ये निवड करावी, असेसुद्धा सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठरविण्यात आले. यासाठी ज्या इच्छुक शिवप्रेमींना या पुतळा समितीमध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी सचिन बोंद्रे यांच्याकडे आपली नावे देण्यात यावी, असेसुद्धा या बैठकीत ठरविण्यात आले आहे.


अश्वारुढ पुतळ्यासाठी पहिल्याच बैठकीत ३१ लक्ष रूपयांचा निधी संकलित

चिखली शहरात बसविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा भव्यदिव्य असावा, यासाठी शिवप्रेमींकडून लोकवर्गणी उभारावी असेसुद्धा या बैठकीत ठराव मांडण्यात आला. या ठरावास चिखली शहरांमध्ये सदर बैठकीस उपस्थित शिवप्रेमींनी उदंड असा प्रतिसाद देऊन पहिल्याच बैठकीमध्ये ३१ लक्ष रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. शहरात होणारा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा हा सर्व जाती धर्माच्या लोकांची अस्मिता व्हावी, यासाठी प्रत्येक चिखली शहर, चिखली ग्रामीण तालुक्यातील प्रत्येक घर प्रत्येक व्यक्तीकडून सहभाग असावा, म्हणून पुतळ्यासाठी देणगी मिळावी यासाठी समिती आग्रही असणार आहे. त्यासाठी पुतळा समितीच्यावतीने कमीत कमी १०० इतक्या कमी रुपयांची पावती छापणार असून, प्रत्येक घरातून पावती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामात आपला खारीचा वाटा उचलण्याची विनंती करणार आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!