चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर रुपयात रवा, खाद्यतेल, साखर आणि चणाडाळ ही आनंदाची शिधा दिवाळीपूर्वी शिधापत्रक धारकांना देण्याचा मोठा वादा केला होता. मात्र दिवाळीचे व भाऊबीजेचे दिवस उलटले तरीपण चिखली तालुक्यातील बर्याच राशन दुकानांमध्ये आनंद शिधा हा पोहोचलाच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरिबाची दिवाळी ही गोड झाली नाही. बुलढाणा जिल्ह्यात शिधाजिन्नस वाटपासाठी ४ लाख ८८ हजार ८ कुटुंबाची यादी शासनाकडे पाठवण्यात आली होती, त्यानुसार आनंदाचे शिधा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र राज्य शासन आणि पुरवठा विभागाचा ताळामेळ नसल्याने शिधाजिन्नस सर्व लाभार्थी कुटुंब यांना आनंद शिधा मिळू शकला नाही. गोरगरीब जनतेला जर तुम्ही आनंद शिधा देऊ शकत नव्हते तर आशेला का लावले, असा सवाल चिखली तालुका ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख किसन धोंडगे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
चिखली तालुक्यामध्ये पुरवठा विभागाचे दोन गोडाऊन आहेत. एक अमडापूर सर्कल आणि एक चिखली सर्कल. अमडापूर सर्कल मध्ये ४३ दुकाने असून पैकी २७ दुकानात आनंद शिधा मिळाला, तर चिखलीच्या गोडाऊनला १२० दुकाने असून पैकी २६ दुकानालाच आनंद शिधा मिळाला. त्यामुळे चिखली तालुक्यातील गोरगरीब जनतेला आनंद शिधेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ऐन दिवाळीच्या टायमात रेशनच्या दुकानांच्या पॉश मशीन ह्या नेट बंद असल्यामुळे किंवा त्यांच्या सर्वर मध्ये अडचण असल्यामुळे आणि दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून मिळालाच नाही. रेशन दुकानात गेले असता दुकानदारांनी साईटचा प्रॉब्लेम आहे, उद्या या, त्यामुळे गोरगरिबाची दिवाळी ही अंधारातच गेली आहे. ऐन दिवाळीच्या टायमात चिखली तालुक्यातील गोरगरीब जनतेला आनंद शिधा मिळाला ना, पीएमजेकेवाय यांचा माल (फुकटचे रेशन) मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरोधात नाराजीचा सूर दिसून येत आहे. दिवाळी झाली, भाऊबीजही झाली, तरीही ग्रामीण भागामध्ये अजूनसुद्धा आनंद शिधा मिळाला नाही. त्यामुळे चिखली तालुक्यातील बरेच रेशन दुकानदार व गोरगरीब जनता नाराजीच्या सुरात आहे. चिखली गोडाऊनमधील १२० दुकानांपैकी फक्त २६ दुकानदारांनाच आनंद शिधा मिळाला आहे. त्यातही साईडचा प्रॉब्लेम, नेट नाही, असे कारणे सांगून बर्याच गोरगरीब जनतेला रेशनच्या मालापासून वंचित राहावे लागले आहे, तसेच ग्रामीण भागामध्ये पीएमजेकेवाय याचा मालसुद्धा गोरगरीब जनतेला अजूनपर्यंत मिळाला नाही, असेही धोंडगे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहे.
————–