– रेशन वाटपात मनमानीसह इतर गंभीर आरोप
लोणार (तालुका प्रतिनिधी) – लोणार तालुक्यातील बाबुलखेड येथील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख जावेद व गावकर्यांनी तहसील कार्यालय येथे तक्रार दाखल केली असून, हा दुकानदार रेशनचे धान्य वाटप न करता मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, इतरही गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आलेले आहेत.
बाबुलखेड येथील रेशन दुकानदाराने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याचा कोणत्याच प्रकारचे धान्य वाटप केलेले नाही. शिवाय, गावातील रेशनधारकांसोबत अरेरावीची भाषा करून गैरवर्तन करीत आहे. रेशनच्या धान्याबद्दल विचारणा केली असता, अजून मलाच मिळाले नाही तर तुम्हाला कुठून देऊ, शिवाय तुम्हाला माझ्याविरोधात कुठे तक्रार करायची ते तुम्ही करू शकता, माझी खूप वरपर्यंत पोहोच आहे, माझं कुणीच काही करू शकत नाही, अशा प्रकारच्या उद्धट भाषेचा वापर गावकर्यांसोबत करीत आहे. सदर रेशन दुकानदारांचा रेशन दुकान चा परवाना रद्द करून गावातील दुसर्या कोणत्याही व्यक्तीकडे द्यावा, अशी गावकर्यांनी तहसीलदाराकडे मागणी केली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत सदरील तक्रारीचा विचार करून रेशन धारकांना न्याय द्यावा, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी गावकर्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी शहर व तालुका, रेशन धारकांच्या न्याय हक्कासाठी तहसील समोर आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन तहसीलदाराला देण्यात आले.
या निवेदनावर भारतीय जनता पार्टी लोणार शहराध्यक्ष गजानन मापारी, तालुका उपाध्यक्ष सुरेश अंभोरे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख जावेद, तालुका कोषाध्यक्ष दिलीप राठोड, आबाराव हाडे, बबन वाघमारे, गजानन वाघमारे, मनोहर वाघमारे, विजय गवई, शेख कसम शेख गुलाब, कचरू सोनुने, विष्णु शिरसाळ, सीताराम खरात, गजानन मानवतकर, विश्वास गवळी व सोबतच अन्य गावकर्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
————-