मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे ) – गेल्या दोन – तीन वर्षांपासून सातत्याने परतीचा पाऊस शेतकर्यांचे नुकसान करत आला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असून, यंदाही परतीच्या पावसाने थैमान घातल्याने मोठे नुकसान झाले. अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी तुंबले आहे. सोयाबीन पाण्यात उभी आहे, तर काही ठिकाणी मळणीयंत्र सुडीजवळ जातांना चिखलात फसत असल्याने काढणी लांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पंचनामे, मदत या भानगडी सुरू असल्या तरी या तुटपुंज्या मदतीने शेतकर्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही.
शेतकर्यांनी अत्यंत मेहनतीने वाढवलेली पिके पाण्यामुळे सडत आहे. सर्वात जास्त नुकसान सोयाबीन पिकांचे होत असून, सुडी लावलेल्या व कापून ठेवलेल्या तसेच शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनला कोंब फुटून हे पिक संपूर्णतः हातामधून गेले आहे. अशा परिस्थितीत मेरा बुद्रूकसह गुंजाळा, मनुबाई, अंत्री खेडेकर परिसरातील पीक नुकसानीसंदर्भात कोणतीही पाहणी व सर्व्हे शासनाकडून करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाणार असून, त्याचा उरल्या-सुरल्या अपेक्षा सुध्दा पावसातच वाया जाणार आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होवून सरसकट मदत मिळण्याची वाट शेतकरीवर्ग पाहत आहे. मागील १५ दिवसांपासून ऐन पीक काढणीच्या सुरु हंगामात सतत पाऊस असल्यामुळे मेरा बुद्रूकसह परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ३ ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे कोणतेही सर्व्हे सुरु नसून, पुन्हा १७ ऑक्टोबर व १८ ऑक्टोबरच्या रात्री संततधार पाऊस झाला. त्यामुळे ऐन पिक काढणीच्या हंगामातच पिके हातामधून जात असून, सोयाबीन मातीमोल झाली आहे, तर पिकांना जमिनीवर पडून कोंब फुटत आहे.
शेतकर्यांची दिवाळी पावसातच जाणार असल्याचे चित्र संपूर्ण मेरा बुद्रूकसह परिसरात आहे. ऐन काढणीस आलेले पिके शेतकर्यांच्या सुध्दा हाती येत नसल्याची परिस्थिती आहे. याबाबत शासनाकडून पीक नुकसानीचे कोणतेही सर्व्हे करण्यात आलेले नसल्याबद्दल शेतकर्यांचे प्रचंड नाराजी सुरु आहे. अनेक शेतकर्यांची सोयाबीन शेतांमध्ये कापून पडलेली आहे. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे कोंब फुटून सोयाबीन, हातामधून निघून गेलेली आहे. हीच परिस्थिती तूर पिकाची असून, कापूस पिकालासुध्दा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीला शेतकर्यांची नगदी पिके असलेले सोयाबीन पीक शेतकर्यांच्या घरात न आल्यामुळे दिवाळी सणाला बाजारात खरेदीसाठी शुकशुकाट आहे.
——