अजित पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असणार्या पावसाने रब्बीचा हंगामसुध्दा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत, शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज केली. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रश्नांकडेसुध्दा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. दरम्यान, अजित पवार यांच्या या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत येण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतलेला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नंतर त्यांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रशासनाला दिले आहेत. विशेष म्हणजे या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, जून महिन्यापासून आजअखेर राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे. या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान खरिपाचे संपूर्ण पीक गेले असून, रब्बी हंगामातील पेरणी केलेले पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील बर्याच ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून, घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच राज्यातील शेतकर्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, तरी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.
आशा सेविकांना किमान वेतन लागू करावे!
राज्यातील आशा सेविका आरोग्य सेवेचा कणा आहेत. आशा सेविका या प्रतिदिन १० ते ४ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण ६ तास पूर्ण वेळ काम करतात. दिवसभर काम करुनही त्यांना पुरेसे आणि वेळेवर मानधन मिळत नाही. कोरोना काळात या आशा सेविकांना आरोग्य व्यव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी खूप मोठा हातभार लावला आहे. या आशा सेविकांना किमान वेतन मिळाल्यास या सेविका अधिक सक्षमपणे व जोमाने काम करतील, तरी त्यांना किमान वेतन लागू करावे, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.
——————-