लोणार (विनोद पाटील तेजनकर) – लोणार तालुक्यात गेले चार ते पाच दिवस परतीच्या पावसाने हाहाकार उडविला असून, ९ ऑक्टोबरच्या रात्री कोसळलेल्या पावसाने सोयाबीनसह इतर पिकांची अतोनात नासाडी केली असतानाच, वडगाव तेजन येथील शेतकर्याच्या सोलरच्या प्लेटोदेखील फोडल्या आहेत. त्यामुळे या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने तातडीने त्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.
गेली चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वडगाव तेजन येथील अनेक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये दिनांक ९ ऑक्टोंबर २०२२ रोजीच्या रात्री रात्रभर झालेल्या संतधार पावसाने उच्चांक गाठत, अतिवृष्टीपेक्षा जास्त म्हणजे १०५ मिलिमीटर ढगफुटीसदृश पाऊस पडून शेतकर्यांच्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. तर रामकिसन कोंडुजी तेजनकर यांच्या शेतातील सोलर पंपसाठी असणार्या सोलर प्लेटसुद्धा वादळी वार्यासह पावसाने फुटून खराब झाल्या आहेत. बर्याच शेतकर्यांचे असे वेगवेगळ्या पद्धतीने नुकसान होऊन ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्यांची चिंता अजूनच वाढली आहे.