आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथून जवळ असलेल्या आळंदी, डुडुळगाव, देहू ( ता. हवेली ) या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने वाहन चालक, रहिवासी त्रस्त झाले आहेत. रस्ता तीर्थक्षेत्र आळंदी – देहू यांना जोडणारा असून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतुन जात आहे. रस्त्याची दुरावस्था दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी केली आहे.
आळंदी देहू जोडणारा रस्ता आळंदी कडून डुडूळगाव फाटा ते सावता माळी मंदिरा पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यात सुरु असलेल्या नलिका डक्टिंगच्या कामामुळे रस्त्याची दुरावस्था वाढली आहे. विकास कामे केल्या नंतर तात्काळ पूर्ववत रस्ता विकिसित करण्याकडे पालिका आणि ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याने रहदारीत नागरिक तसेच वाहन चालक यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांनी अपघाताची शक्यता असल्याने तात्काळ खड्डे भरण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
काही ठिकाणी इंद्रायणी कडे जाणाऱ्या वाय जंक्शन रस्त्यावर चेंबरला असलेली झाकणे तुटलेने चेंबर उघडे आहेत. रात्री, अपरात्री वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. लहान मुले, दुचाकी, तीन चाकी वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करतात. येथील वळण असल्याने अपघात होऊ शकतो असे जाणकार सांगतात. या मार्गावर वाढती वाहतूक असल्याने गतिरोधक बसवण्याची मागणी होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाने या रस्त्याची दुरावस्था दूर करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. खड्डे भरून, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक विकसित केल्यास अपघात होणार नाहीत असे सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी सांगितले.