Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPoliticsVidharbha

‘मातोश्री’चे निमंत्रण आले तर विजयराज शिंदेंची शिवसेनेत घरवापसी निश्चित!

– बुलढाणा मतदारसंघातील राजकीय जनमाणस उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा गोपनीय अहवाल!

पुरुषोत्तम सांगळे

मुंबई/बुलढाणा – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील लोकमनाचा गोपनीय अहवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावला असून, बुलढाणा विधानसभा व लोकसभा मतदारसंघातील जनमाणस उद्धव ठाकरे यांना अनुकूल असल्याचे मत या अहवालातून पुढे आल्याचे खात्रीशीर वृत्त प्राप्त झाले आहे. तसेच, बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड (आता शिंदे गट) यांना पराभूत करायचे असेल, तर तब्बल तीनवेळा बुलढाण्याचे शिवसेना आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांना परत शिवसेनेत बोलवावे, अशी मागणी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वातून पुढे आली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यावर याबाबतची विशेष जबाबदारीदेखील सोपाविण्यात आली असल्याचे या वरिष्ठ सूत्राने सांगितले. दुसरीकडे, विजयराज शिंदे हेदेखील ‘मातोश्री’चे बोलावणे आले तर घरवापसी करण्यास तयार आहेत, असे त्यांच्या निकटच्या सूत्राकडून कळले असून, तसे झाले तर आ. संजय गायकवाडविरुद्ध विजयराज शिंदे ही लढत पुन्हा एकदा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात पहायला मिळणार आहे.

यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख हे शिवबंधन हाती बांधणार असल्याचे निश्चित झाले असून, अशाच प्रकारची रणनीती बुलढाण्यातदेखील आखली जात आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा नेतृत्व करणारे व पाचवेळा विधानसभेची निवडणूक लढविणारे पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये आपल्या समर्थकांसह तीन वर्षांपूर्वी प्रवेश केला होता. परंतु, भाजपचे राजकीय वातावरण त्यांना फारसे मानवले नाही. त्यातच शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर त्यांच्यातील कट्टर शिवसैनिक पुन्हा जागा झाला असून, ते सद्या भाजपात अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने बंडखोरांच्या मतदारसंघातील जनमाणसाच्या कौलाचे गोपनीय अहवाल मागवण्यात आले होते. त्यानुसार, बंडखोरांच्या मतदारसंघातील जनमाणसाचा कल जाणून घेतला गेला. या गोपनीय अहवालानुसार, बुलढाणा लोकसभा व विधानसभा मतदारसंघात जनमाणस उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत सहानुभूती बाळगून असून, शिवसेनेचा असलेला बालेकिल्ला बंडखोरीनंतरही ढासाळलेला नाही. त्यातच, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जालिंधर बुधवत, आशीष रहाटे यासारख्या नेत्यांनी ठाकरे गटाची धार कायम ठेवल्याने जनमाणसावर मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे, पुढील दोन वर्षात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जर निवडणुका झाल्या तर त्यात शिवसेनेला (ठाकरे) फायदा होऊ शकतो. त्यातच आताच्या राजकीय परिस्थितीत माजी आमदार विजयराज शिंदे हे पुन्हा शिवसेनेत आले तर, बुलढाण्याची जागा ठाकरे यांच्याकडे कायम राहू शकते, असा निष्कर्षही पुढे आला आहे. त्यामुळे, आज झालेल्या ‘मातोश्री’वरील बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच याबाबत सूतोवाच करून, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांना विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले असल्याचे ‘मातोश्री’वरील विश्वासनीय सूत्राने सांगितले आहे.
विजयराज शिंदे यांची घरवापसी करून बुलढाण्यात बंडखोर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना आव्हान देण्याची रणनीती शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर आखली जात असल्याचे, या घडामोडींतून स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांपूर्वी विजयराज शिंदे हे भाजपात गेल्यानंतर, ते भाजपातदेखील अडगळीत पडले होते. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनाविरुद्ध भाजप अशा लढतीत ते संजय गायकवाड यांच्याविरोधात भाजपकडून लढतील, अशी अटकळ होती. परंतु, संजय गायकवाड हे शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपसोबत गेल्याने शिंदे यांची पुन्हा राजकीय कोंडी झाली. या राजकीय कोंडीतून बाहेर पडण्यासाठी तेदेखील ‘मातोश्री’च्या निमंत्रणाची वाट पाहात असल्याचे, त्यांच्या निकटवर्तीय सूत्राकडून समजले आहे. त्यामुळे लवकरच विजयराज शिंदे हे शिवसेनेत परत येतील, अशी राजकीय चिन्हे आहेत.


”शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंडखोरी झाली, तेव्हा तेव्हा मी शिवसेनेसोबत होतो. माझ्यासारख्या नवख्या नेतृत्वाने शिवसेनेचे तत्कालिन बंडखोर डॉ. राजेंद्र गोडे यांचा १० हजाराच्या मताने पराभव केला होता. राजेंद्र गोडे हे छगन भुजबळ यांच्यासोबत बंडखोरी करून शिवसेनेतून बाहेर पडले होते व ते गृहराज्यमंत्रीदेखील होते. एका मंत्र्याचा माझ्यासारख्या कट्टर पण साध्या शिवसैनिकाने पराभव केला होता, हा इतिहास विसरता येणार नाही. आपल्यासोबत शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने अद्याप तरी संपर्क साधलेला नाही. जेव्हा संपर्क होईल, तेव्हा काय निर्णय घ्यायचा ते ठरवू. देशात लोकशाही आहे, आणि प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.”

– विजयराज शिंदे, माजी शिवसेना आमदार बुलढाणा, तथा विद्यमान भाजप नेते
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!