Uncategorized

शुकदास म्हणे, करा शुभ कर्म । मानवता धर्म, हाचि असे।।

‘आचार प्रभवो धर्म’ असे म्हटले जाते. समाजाची धारणा करणारा, समाजाला एकत्र आणणारा, समाजाला नीती शिकविणारा, समाजाला सदाचार शिकविणारा तो धम. परस्परांशी प्रेमाने, आपुलकीने जिव्हाळ्याने, सहानुभूतीने वागणे म्हणजे मानवता धर्म होय. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे मानवता. सदाचारी वर्तन म्हणजे मानवता धर्म. संपूर्ण मानव जातीचा एकच धर्म आहे तो म्हणजे मानवता. संत आणि समाजसुधारकांनी जी शिकवण दिली ती मुळात मानवता धर्माची शिकवण होय. ‘हे विश्वची माझे घरं’ यातून संत ज्ञानेश्वर महाराजांना अखिल मानवता धर्म अभिप्रेत आहे.

संतांचे विचार प्रत्येक काळात मानवजातीला उपकारक ठरले आहे. संतांनी नेहमी माणसाच्या सुखी जीवनाचा विचार केलेला आहे. नेमके सुख कशात आहे?माणसाचे आचरण कसे असावे? मित्रांशी कसे वागावे? शत्रूंशी आपले वर्तन कसे असावे? इत्यादी संदर्भातील मार्गदर्शन संत महात्मे करीत असतात. याची प्रचिती बुलढाणा जिल्ह्यातील निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या’अनुभूति’ग्रंथातील अभंगातून येते. संत शुकदास महाराज आपल्या ‘अनुभूति’ग्रंथातील २३५ क्रमांकाच्या अभंगात म्हणतात की,

कोणाचे वाईट, चिंतु नये मनी ।होत असे हानी, आपुलीच।।
दुःखांचे प्रसंगी, व्हावे वाटे करी। हात करा वरी, मदतीचा।।
शत्रूचादेखील, करावा आदर। मित्रा बरोबर, वागवावे।।
शुकदास म्हणे, करा शुभ कर्म । मानवता धर्म, हाचि असे।।

आपण आपल्या मनाने कुणाचेही कधीही वाईट चिंतू नये. आपण इतरांचा द्वेष करू नये. आपण जर इतरांचे वाईट चिंतत असू तर आपलेच अधिक नुकसान होते. आपलीच हानी होते. सुखात कुणीही सहभागी होत असते, परंतु आपण दुसर्‍याच्या दुःखात सहभागी झाले पाहिजे. इतरांचे थोडे दुःख वाटून घेतले पाहिजे. ज्यांना मदतीची खरोखर गरज आहे अशा गरजूंना मदत करण्यासाठी आपला हात नेहमी वर असला पाहिजे. मित्राचा आदर तर आपण नेहमीच करीत असतो. शत्रूचासुद्धा आपण आदर केला पाहिजे. शत्रूलासुद्धा मित्रासारखे वागविले पाहिजे. शुकदास महाराज म्हणतात, आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. मानव हितकारी कर्मातच खर्‍याअर्थाने मानवताधर्म दडलेला आहे. इतरांचे वाईट न चिंतता दुसर्‍याच्या दुःखात वाटेकरी होऊन शत्रूचा आदर करून चांगले कर्म करण्यातच खर्‍या अर्थाने मानवता धर्म सामावलेला आहे. मानवा मानवातील परस्पर स्नेहभाव जगण्यातच खरा मानव धर्म आहे, असे संत शुकदास महाराज सुचवितात. संत शुकदास महाराजांच्या ‘अनुभूति’ ग्रंथातात २३६ क्रमांकाचा याच आशयाचा आणखी एक अभंग आढळून येतो. महाराज म्हणतात की,

आडमुठेपणा, उपयोगी नाही ।शांततेने घेई, निर्णयासी।।
संयम ठेवून, बोलावे चालावे। सर्वांना करावे, आनंदीत।।
विवेक बुद्धीचा, करावा वापर । थांबा क्षणभर, बोलतांना।।
शुकदास म्हणे, हळूवारपणे। सांभाळावी मने, अनेकांची।।

हेकेखोरपणा हा कधीच चांगला नसतो. जीवनात कधीही माणसाने कोणताही निर्णय घेताना शांततेने घेतला पाहिजे. जेणेकरून माणसाला यश मिळेल. माणसाने बोलताना नेहमी संयम ठेवला पाहिजे. संयमातच शहाणपण असते. आपण स्वतःआनंदित राहून इतरांनाही आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांच्या आनंदातच आपला आनंद मानला पाहिजे. माणसानी नेहेमी आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवली पाहिजे.योग्य काय अयोग्य काय असा सारासार विचार करूनच माणसाने बोलले पाहिजे. बोलून विचार केल्यापेक्षा क्षणभर थांबून विवेक बुद्धीच्या आधारेच बोलले पाहिजे. शुकदास महाराज म्हणतात, घाई न करता विचारपूर्वक बोलल्यास पुष्कळ संकटे टळतात. इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. या अभंगात शांतता, संयम या मूल्यांचे दर्शन घडते. सद्सद्विवेकबुद्धी वापरण्याचा सल्ला महाराज देतात. सर्वांच्या सुखाचा विचार महाराज करताना दिसतात. सर्वांची मने सांभाळावीत अशी इच्छा महाराज व्यक्त करतात. या लोकहितकारी आणि लोककल्याणकारी विचारातच कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या संवेदनशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व व्याख्याते असून, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहे. संपर्क – ९९२३१ ६४३९३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!