– पगारासाठी लागतात ३६० कोटी, दिले फक्त ३०० कोटी, आता पगाराचे वांधे
– एसटी कर्मचार्यांत राज्य सरकारविषयी तीव्र संताप
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी तोंडावर आली असताना, रखडलेल्या वेतनापोटी राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या कर्मचार्यांसाठी ३०० कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे दिवाळीचा पगार मिळणार असला तरी, बोनस व इतर मागण्यांबाबत सरकारने चुप्पी साधली आहे. प्रत्येक महिन्याला एसटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी ३६० कोटी रुपये लागतात. पण तीन महिन्यांमध्ये या सरकारने फक्त ६०० कोटी रुपयांची रक्कमच महामंडळाला दिली असल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे. त्यामुळे या सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट एसटी कर्मचार्यांत निर्माण झाली आहे.
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला तातडीने मदत जाहीर करत, कर्मचार्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचार्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते. पण सरकारने ३०० कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली. सरकारने जाहीर केलेल्या या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रत्येक महिन्याला एसटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी ३६० कोटी रुपये लागतात. पण तीन महिन्यांमध्ये या सरकारने फक्त ६०० कोटी रुपयांची रक्कमच महामंडळाला दिली असल्याची माहितीही श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. त्यामुळे या महिन्यांचा कर्मचार्यांचा पगार वेळेवर झाला नाही. एसटी महामंडळाने ७३८ कोटी रुपयांची मागणी केली होती. आता फक्त ३०० कोटी रुपयेच का दिले? असा सवाल बरगे यांनी उपस्थित केला. सत्तेत नसताना हेच लोक बोलत होते की एसटी कर्मचार्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना वेळेवर पगार मिळायला पाहिजे. पण हे लोक सत्तेवर आल्यावर आश्वासन विसरले असल्याचे बरगे यांनी सांगून, दिवाळी तोंडावर आली आहे, या सणात कर्मचार्यांची कुचंबना होऊ नये, यासाठी सरकारने तत्काळ आम्ही जेवढ्या निधीची मागणी केली होती, तेवढा निधी द्यावा. अन्यथा, आम्हाला या सरकारविरोधात संघर्ष उभा करावा लागेल, असा इशाराही बरगे यांनी दिला आहे.
—————-