पैठण (शिवनाथ दौंड) – पैठण तालुक्यातील होनोबाचीवाडी येथील गट नंबर ६४ मधील शेतकरी चित्तरसिंग बहुरे यांच्या गाईच्या वासराला मंगळवार रात्री जंगली वन्यप्राण्याने गंभीर जखमी केले असून, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी वासराला बघितले व परिसरात पाहणी केली असता, परिसरात वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले, त्यावरून बिबट्याचेच (चित्ता) ठसे असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असून, या करिता लोकांनी सावध रहावे, रात्री घराबाहेर पडू नये, किंवा सावधगिरी बाळगावी, असे वनविभागाचे वनरक्षक उमेश मार्कंडे यांनी आवाहन केले आहे.
होनोबाचीवाडी येथील परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. होनोबाचीवाडी येथील गट नंबर ६४ मध्ये एका गाईच्या वासराला वन्यप्राण्याने गंभीर जखमी केले आहे. ही माहिती गावातील नागरिकांनी संबंधित वनविभागाचे अधिकारी यांना दिली असता, वनविभागाचे अधिकारी उप वनसंरक्षक सूर्यकांत मंकावार, वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक उमेश मार्कंडे आणि वनमजूर रामधन राठोड, मुख्तार शेख, यांनी होनोबाचीवाडी येथील गट नंबर ६४ मध्ये घटनास्थळी भेट दिली. परिसरात पाहणी केली असता बिबट्याचेच ठसे असल्याचे सांगितले. परिसरातील लोकांनी सावध रहावे रात्री घराबाहेर पडू नये, किंवा सावधगिरी बाळगावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, मोठ मोठ्याने आवाज करत रहायचे, रेडिओ, स्पीकर वगैरेवर गाणे वाजवावे, वेळोवेळी फटाके वाजवावे, बिबट्या, वाघ दिवसभर एकांतात बसून राहतात आणि रात्री शिकार करतात. याकरिता सर्वच सावध रहा आणि काही वाटल्यास गावातील नागरिकांनी वनविभागाला कळवावे, असे वनपरीक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.